![]()
दुबईमध्ये अडकून पडलेल्या पुणे येथील एका महाविद्यालयाच्या ८० विद्यार्थ्यांमध्ये हिंगोलीच्या खुशी महावीर बडेरा या विद्यार्थीनीचा समावेश आहे. सर्व जण सुखरुप असून सध्याच्यास्थितीत कुठलीही अडचण नसल्याचे खुशी यांनी रविवारी ता. १ त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून सांगितले. हिंगोली येथील खुशी महावीर बडेरा ह्या पुणे येथील एका महाविद्यालयात एमबीए शिक्षणासाठी राहतात. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा दुबई येथे शैक्षणिक उपक्रमांतर्गत सहल आयोजित केली आहे. त्यानुसार या महाविद्यालयातून ८० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सदर सर्व विद्यार्थी ता. २३ फेब्रुवारी रोजी पुणे येथून मुंबई मार्गे दुबई येथे गेले आहेत. त्या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या शिवाय तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनही झाले आहे. दुबई मध्ये विविध स्थळांना भेटी दिल्यानंतर त्यांचा रविवारी ता. १ दुबई येथून परतीचा प्रवास ठरला होता. त्यानुसार सर्व व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे सर्व विद्यार्थी दुबईतच अडकून पडले आहेत. विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडल्याने त्यांच्या कुटुंबियांना चिंता लागली आहे. त्यानंतर आज सकाळी खुशी यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून सर्व जण एका हॉटेलमध्ये सुखरुप असून कुठल्याही प्रकारची अडचण नसल्याचे सांगितले. खुशीच्या या संदेशानंतर बडेरा परिवाराने सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. विद्यार्थ्यांची सर्व चोख व्यवस्था असून सर्व जण सुखरूप आहेत. उड्डाण सुरु झाल्यानंतर तातडीने भारतात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर वेळ प्रसंगी विशेष विमानाने विद्यार्थ्यांची भारतात येण्याची व्यवस्था करण्याची ग्वाही देखील महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिल्याचे महावीर बडेरा यांनी सांगितले.
इराण-अमेरिका युद्ध:दुबईत अडकलेल्या पुण्यातील 80 विद्यार्थ्यांमध्ये हिंगोलीच्या खुशी बडेराचा समावेश, सर्वजण सुखरूप असल्याचा संदेश
