हिंगोली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:प्रमाणपत्रांच्या वाटपासह सातबारा दुरुस्ती केली जाणार




हिंगोली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविले जाणार असून ता. ७ मार्च पासून या अभियानाला सुरवात केली जाणार आहे. या अभियानात विविध प्रमाणपत्रांसह सात बारांची दुरुस्तीही केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी व नागरीकांना मुदतीमध्ये तसेच मंडळामध्येच आवश्‍यक कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत. राज्यात शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा १ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातून लाभार्थी शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्ती, फेरफार यासह विद्यार्थ्यांना लागणारी प्रमाणपत्रे सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे अभियान राबविले जात असून या माध्यमातून प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात मंडळस्तरावर शिबीर घेतले जाणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्हयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेतले जाणार आहे. यामध्ये वसमत तालुक्यात उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, प्रभारी तहसीलदार विनोद डोनगावकर यांच्या उपस्थितीत हे शिबीर होणार आहे. ता. ७ मार्च रोजी गिरगाव, ता. १४ मार्च कुरुंदा, ता. ३० मार्च टेंभूर्णी, ता. १० एप्रील हयातनगर, ता. १७ एप्रील आंबा, ता. २४ एप्रील बाभूळगाव, ता. २ मे हट्टा, ता. ८ मे वसमत तर ता. १५ मे रोजी वसमत शहरात शिबीर घेतले जाणार आहे. तसेच औंढा नागनाथ तालुक्यात ता. ७ मार्च जवळाबाजार, ता. १४ मार्च शिरडशहापूर, ता. १० एप्रील पिंपळदरी, ता. १७ एप्रील साळणा, ता. २४ एप्रील सिध्देश्‍वर, ता. ८ मे व ता. १५ मे औंढा नागनाथ, तर ता. २२ मे रोजी येहळेगाव येथे शिबीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *