लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने क्षमा करावी – VastavNEWSLive.com


सत्याचा शोध की बदनामीचा कट? – लोहा प्रकरणातील धक्कादायक वास्तव

नांदेड (प्रतिनिधी)-लोहा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने अलीकडे मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात फिर्यादीने कंधार न्यायालय येथे शपथपत्र दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर शंका उपस्थित केली. त्याने आपल्या शपथपत्रात असा आरोप केला की संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला अपेक्षित कारवाई न करता वेगळीच भूमिका घेतली.

मात्र, या शपथपत्राला ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने प्रसिद्धी देण्यात आली, त्यामागे काही वेगळेच गणित असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या एका तीन अक्षरी आडनावाच्या पोलिस अंमलदाराने  या प्रसिद्धीमागे सूत्रे हलवली असल्याची चर्चा आहे.त्याला कोणी पाठिंबा दिला असेल तर त्याचा शोध घ्यायचा आहे.

१६ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेत केंद्रप्रमुख दिगंबर रामचंद्र शिंदे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या कारवाईनंतर काही व्यक्तींना वाचवण्याचा आणि काहींना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संबंधित शपथपत्रात करण्यात आला.

न्यायालयात शपथपत्र दाखल करणे हा कायदेशीर अधिकार असला, तरी त्याला तात्काळ प्रसिद्धी देऊन संपूर्ण लाच लुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, हे अधिक चिंताजनक आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, या बदनामीमागे नेमका कोणाचा स्वार्थ दडलेला आहे? काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात एका पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतरच ही प्रसिद्धी मोहीम सुरू झाली, हा योगायोग मानायचा की नियोजित कट?

दुर्दैवाने, काही मोदक छाप पत्रकारांनीही पुरेशी शहानिशा न करता ही माहिती जशीच्या तशी प्रसिद्ध केली. पत्रकारितेचा मूलमंत्र सत्य आणि जबाबदारी हा आहे; कोणत्याही व्यक्ती किंवा विभागाविरुद्ध ‘सुपारी पत्रकारिता’ करणे हा समाजाशी विश्वासघात आहे.म्हणूनच १९५० च्या दशकातील पत्रकार स आदत हसन मंटो यांनी सांगितले होते की विक्री झालेला पत्रकार आणि वेश्या यातील तुलना करतांना त्यांनी वेश्या सन्मानाने मोठी असल्याचे सांगितले होते. ते त्यांचे शब्द आजही तंतोतंत खरे ठरत आहेत.

आम्हीही २६ फेब्रुवारी रोजी संबंधित शपथपत्राच्या आधारे बातमी प्रसिद्ध केली होती. पण इतरांनी बातमी प्रसिद्ध केली आणि आम्ही मागे राहिलो असा त्यातील आमचा भाव होता. परंतु आज परिस्थितीचे संपूर्ण सत्य समोर आल्यानंतर आम्हाला जाणवते की अधिक सखोल पडताळणी करणे आवश्यक होते. केवळ एका बाजूच्या माहितीवर विश्वास ठेवून बातमी देणे ही आमची चूक होती.

त्या अनुषंगाने, आम्ही जाहीरपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मनःपूर्वक माफी मागत आहोत. आमच्याकडून झालेल्या त्रुटीची आम्ही जबाबदारी स्वीकारतो आणि भविष्यात अधिक सजग, पारदर्शक व तथ्याधिष्ठित पत्रकारिता करण्याचा निर्धार व्यक्त करतो. सत्य लपवता येत नाही ते उशिरा का होईना, पण समोर येतेच. आणि जेव्हा सत्य उघड होते, तेव्हा चुकीची दिशा दाखवणाऱ्यांचे मुखवटे आपोआप गळून पडतात.

आम्ही प्रसिद्ध केलेली बातमी ज्या बाबत आम्ही आज माफी मागत आहोत ..

लोहा येथील लाच प्रकरणात ‘मुख्य आरोपी’ वाचला? तक्रारदाराचे शपथपत्र; एसीबीच्या कारवाईवर गंभीर प्रश्न



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *