![]()
हिंगोली शहर पोलिसांच्या सतर्कतेने तसेच ऑटो चालकाच्या प्राणणिकपणामुळे कलगाव (ता.हिंगोली) येथील महिलेने दवाखान्यात उपचारासाठी आणलेले सुमारे १७ हजार रुपये परत मिळाले आहेत. पैसे परत मिळताच महिलेने पोलिसांसह ऑटो चालकाचे आभार व्यक्त केले. याबाबत सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील प्रतिभा वाढवे ह्या त्यांच्या चार महिन्याच्या मुलीच्या उपचारासाठी शनिवारी ता. २८ हिंगोली शहरात आणले होते. हिंगोली बसस्थानकावर उतरून त्या ऑटोने रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी ऑटोतून उतरतांना गडबडीत त्यांची पिशवी ऑटोमध्येच पाठीमागे विसरून राहिली. दरम्यान, रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना पैसे असलेली पिशवी ऑटोतच विसरून राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पैसे विसरून राहिल्यांना त्यांना रडू आवरत नव्हते. मात्र पोलिसांनी त्यांना धिर दिला अन त्या ज्या ठिकाणावरून ऑटोत बसल्या त्या ठिकाणी असलेल्या दुकाना बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये एका ऑटोवर स्मार्ट बाजारच्या जाहिरातीवरून ऑटोची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संतोष करे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे, गणेश लेकुळे, संजय मार्के, गणेश वाबळे यांच्या पथकाने तातडीने स्मार्ट बाजार गाठून त्यांनी किती ऑटोवर जाहिराती लावल्या याची माहिती घेतली अन त्यांचे नंबर घेतले. त्यानुसार ७३ ऑटोवर जाहिरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सर्व ऑटो चालकांशी संपर्क साधला. यावेळी ऑटोचालक संतोष पाईकराव यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ऑटोच्या पाठीमागील बाजूची पाहणी केली असता त्यात पिशवी आढळून आली. त्यांनी सदर पिशवी असल्याचे सांगत शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी पिशवीची तपासणी केली असता त्यात १७ हजार रुपये व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी पैसे व पिशवी प्रतिभा यांच्या हवाली केली. मुलीच्या उपचारासाठी आणलेले पैसे मिळताच त्यांनी पोलिस व ऑटो चालक संतोष यांचे आभार व्यक्त केले.
हिंगोली पोलिसांची सतर्कता अन् ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा:मुलीच्या उपचाराचे 17 हजार रुपये महिलेला केले परत
