वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – प्रा. मुपकलवार:हिंगोलीतील ग्रंथोत्सवात व्याख्यान




वाचन संस्कृती जोपासण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक असून, सृजनशील लेखनासाठी कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण आणि योग्य भाषेची निवड महत्त्वाची आहे, असे मत प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी रविवारी ता १ येथे केले. येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रा. जी. पी. मुपकलवार यांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संकृती तसेच सृजनशील लेखन या विषयावर व्याख्यान झाले यावेळी बोलताना प्रा. मुपकलवार म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते; मात्र मानवी संवेदना, अनुभव आणि सर्जनशीलता यांना पर्याय ठरू शकत नाही. लेखकासाठी कल्पनाशक्ती बरोबरच सूक्ष्म निरीक्षण अत्यावश्यक असून, योग्य शब्दांची व भाषेची निवड लेखन प्रभावी बनवते. वाचकांना सहज समजेल अशा साध्या व सरळ भाषेत लेखन केल्यास साहित्य अधिक परिणामकारक ठरते. मराठीसह इतर भाषांचे ज्ञानही आवश्यक असून, ज्या भाषेत व्यक्त होणे सोपे वाटते त्या भाषेचा वापर करावा. त्याचबरोबर मराठी भाषेचा प्रसार व जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. वाचन केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, तसेच शब्दसंग्रह वाढत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य कथा, कादंबऱ्या, कविता यांचे नियमित वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनातूनच विचारशक्ती, आकलन क्षमता आणि व्यक्तिमत्व विकास साध्य होतो, असेही त्यांनी नमूद केले. लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून मानसिक समाधान व आत्मविकासाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील वास्तव समजून घेण्यासाठी आणि योग्य विचार मांडण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रा. मुपकलवार यांनी अधोरेखित केले. सूत्रसंचालन गोडाती काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रतन आडे यांनी केले. या व्याख्यान कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *