जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड, तीन आरोपी जेरबंद;विमानतळ पोलिसांची कार्यवाही


नांदेड (प्रतिनिधी) – विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत विमानतळ गुन्हेशोध पथकाने तीन आरोपींना अटक करून चोरीस गेलेले दोन मोबाईल हस्तगत केले आहेत.

३१ जुलै २०२६ रोजी रात्री एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागे, महाराणा प्रताप चौक परिसरात फिर्यादी मोटारसायकलवरून घरी जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून दगडाने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीजवळील सॅमसंग Galaxy S24 मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. त्याचवेळी परिसरातील आणखी एका नागरिकाकडील रेडमी कंपनीचा मोबाईल देखील जबरीने लुटण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) व ३(५) अन्वये दाखल करण्यात आला.

या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे हाती घेण्यात आली. पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे तसेच गुन्हेशोध पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार व स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन अवघ्या २४ तासांत त्यांना जेरबंद केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

  1. प्रतीक हरीष सोनटक्के (वय २२ वर्षे)
  2. राहुल अशोकराव थोरात (वय २३ वर्षे)
  3. प्रशिक देवानंद श्रावणे (वय १९ वर्षे)

हे तिन्ही आरोपी रा. राजीव गांधी शाळेमागे, बालाजी नगर, नांदेड येथील रहिवासी आहेत.

आरोपींकडून अंदाजे ८ हजार रुपये किमतीचा सॅमसंग Galaxy S24 मोबाईल व ६ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा टचस्क्रीन मोबाईल असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, सपोनि/राष्ट्रपाल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे तसेच गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमलदार चिंतोरे, जावेद शेख, जयपासिंघ ठाकूर, शोएब शेख आणि प्रवीण ससाणे यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पडली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे करीत आहेत. तसेच नागरिकांनी जबरी चोरी, लूटमार किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *