![]()
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक पत्र धाडले असून, पक्षाच्या घटनेत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबत वैध कागदपत्रे आणि अधिकृत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून २७ जुलै रोजी पाठवण्यात आलेले हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नावे आले आहे. ही एक तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया असली, तरी पक्षाच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाच्या संविधानातील काही प्रमुख कलमांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या दुरुस्त्यांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आयोगाला मिळालेली नाहीत. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, पक्षाच्या घटनेमधील कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्ये करण्यात आलेल्या बदलांना मान्यता देणारे कोणतेही पत्र किंवा ठराव आयोगाला प्राप्त झालेला नाही. या त्रुटीवर बोट ठेवत, आयोगाने आता या सर्व दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून कायदेशीर आणि वैध कागदपत्रे तसेच कार्यकारिणीत संमत झालेले मूळ प्रस्ताव तातडीने सादर करण्याची मागणी केली आहे. २६ फेब्रुवारीच्या कार्यकारिणीत काय घडले होते? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठे संघटनात्मक बदल झाले होते. पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची विशेष राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून एकमताने निवड करण्यात आली होती. अध्यक्षांच्या निवडीसोबतच पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात संविधानातील कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्ये काही संघटनात्मक आणि तांत्रिक बदल करण्यात आले होते. नियमांनुसार, कोणत्याही राजकीय पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलांची अधिकृत माहिती आणि ठराव निवडणूक आयोगाकडे जमा करणे बंधनकारक असते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही माहिती अद्याप पोहोचली नसल्याने आयोगाने हे स्मरणपत्र वजा नोटीस पाठवली आहे. पुढील प्रक्रिया काय? निवडणूक आयोगाच्या या पत्रानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधी आणि तांत्रिक विभागाला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. २६ फेब्रुवारीच्या बैठकीतील सर्व ठराव, उपस्थित नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आणि घटनादुरुस्तीचे रीतसर प्रस्ताव आता निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागतील, जेणेकरून पक्षाच्या या नव्या बदलांना कायदेशीर मान्यता मिळू शकेल. हे ही वाचा… ‘मातोश्री’वरील बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी:एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय?; उद्धव ठाकरेंनी झापले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नवीन नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत ठाणे आणि कल्याणमधील दोन गटांतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. स्वतःच्या डोळ्यांसमोर पदाधिकाऱ्यांची ही गटबाजी आणि राडा पाहून उद्धव ठाकरे अत्यंत संतापले आणि त्यांनी सर्वांची चांगलीच कानउघाडणी केली. “एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय? अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना झापले. सविस्तर वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाचे पत्र:घटनेतील बदलांचे पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश, नेमके प्रकरण काय?
