न्यायव्यवस्थेवरील विश्वास उरलेला नाही:अरविंद सावंतांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- भ्रष्टाचार आणि विध्वंस हेच सरकारचे मॉडेल




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, न्यायव्यवस्था, धर्मस्वातंत्र्य कायदा, नाशिकमधील रस्त्यांची अवस्था आणि संसदेच्या कामकाजासह विविध विषयांवर जोरदार टीका केली. देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंसाठी सरकारला जबाबदार धरत कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सावंत म्हणाले की, देशातील न्यायव्यवस्था पूर्वीसारखी विश्वासार्ह राहिलेली नाही. अनेक प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. काही मोठ्या नेत्यांवरील आरोपांनंतरही त्यांना ‘क्लीन चिट’ मिळते, तर विरोधकांवर तपास यंत्रणांचा दबाव आणला जातो, असा आरोप त्यांनी केला. ब्रिजभूषण प्रकरणावरून न्यायव्यवस्थेवर टीका महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा उल्लेख करत सावंत म्हणाले की, महिलांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ येत आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव वाढत असून लोक भीतीपोटी बोलण्यास तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. संसदेत चर्चेला परवानगी नसल्याचा आरोप संसदेच्या अधिवेशनात नीट परीक्षा, महिलांवरील अत्याचार आणि अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्यासाठी संधी दिली नसल्याचा आरोप सावंत यांनी केला. प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात कथित चोरीच्या मुद्द्यावरही सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. धर्मस्वातंत्र्य कायद्यावर सरकारला टोला महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली म्हणून सर्व प्रश्न सुटत नाहीत. महिलांना खरे स्वातंत्र्य मिळाले आहे का, हा खरा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. नाशिकच्या खड्ड्यांवरून सरकारवर निशाणा नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करत सावंत म्हणाले की, कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची कामे झाली, मात्र रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कुंभमेळा संपल्यानंतर या कामांमधील भ्रष्टाचार बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये देशभर भ्रष्टाचार झाला असून अनेक ठिकाणी नव्याने बांधलेले रस्ते आणि पूलही निकृष्ट दर्जामुळे खराब झाले आहेत. भ्रष्टाचार आणि विध्वंस हेच सरकारचे मॉडेल सावंत यांनी सरकारवर पर्यावरणाची हानी आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत, “देशभर इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली विध्वंस आणि भ्रष्टाचार सुरू आहे,” अशी टीका केली. वृक्षतोड, रस्त्यांची दुर्दशा आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करत सावंत म्हणाले की, लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या घरांपर्यंत जाऊन पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. व्यंगचित्र आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा व्यंगचित्रे आणि सरकारवरील टीकेबाबत बोलताना सावंत म्हणाले की, लोकशाहीमध्ये व्यंगचित्रे आणि टीका स्वीकारण्याची वृत्ती असली पाहिजे. मतभिन्नता व्यक्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री नियुक्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी हा विषय “हास्यास्पद” असल्याचे म्हटले. राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रशासकीय प्रश्न प्रलंबित असताना अशा चर्चांमध्ये सरकार अडकले असल्याची टीका त्यांनी केली. जनसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. हेही वाचा… ‘पालकमंत्री करा’च्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका:म्हणाले- ‘फ्लेक्स काढायला सांगितले, नाशिकच्या खड्ड्यांकडे लक्ष द्या’ नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘छगन भुजबळांना पालकमंत्री करा’ अशी मागणी करणारे होर्डिंग लावल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या मागणीपासून स्वतःला दूर ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित फ्लेक्स तत्काळ काढण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले, “भुजबळांना पालकमंत्री करा, याचा अर्थ मीच पालकमंत्री व्हावे असा नाही. ज्यांनी माझ्या नावाचे फ्लेक्स लावले, त्यांच्याबद्दल मी नापसंती व्यक्त केली असून ते तत्काळ काढण्यास सांगितले आहे.” येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *