नांदेड/ताडकळस (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने नांदेड व परभणी जिल्ह्यात धडक कारवाई करत मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण २५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरात २७ फेब्रुवारी रोजी छापा टाकण्यात आला. भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर कारवाई करत पोलिसांनी २४ हजार ३३० रुपयांची रोख रक्कम, चार मोबाईल फोन, लेनोवो कंपनीचा टॅब तसेच इतर साहित्य असा एकूण ७९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील मौजे लिमला येथे असलेल्या राजकला क्रीडा व सांस्कृतिक मंडळावर छापा टाकण्यात आला. येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून २० हजार ९०० रुपयांची रोख रक्कम व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या ठिकाणी जुगारासोबतच देशी दारू व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध मुंबई जुगार कायदा व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास ताडकळस पोलीस ठाणे करीत आहे.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे,पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,गणेश धुमाळ, संजीव जिंकलवाड, कामाजी गवळी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या अधिकृत हेल्पलाईनवर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
Post Views: 56
