सांस्कृतिक भवन दुरुस्त होणार, टाऊन हॉल जागेवर नवे नाट्यगृह:बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महापौरांचे प्रतिपादन




शहराच्या सांस्कृतिकतेची ओळख असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहाची दुरुस्ती केली जाईल, तसेच मनपा टाऊन हॉलच्या जागेवर नवीन नाट्यगृह उभारण्यात येईल, अशी घोषणा महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केली. राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर तेजवानी यांनी सांगितले की, अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या टाऊन हॉलच्या जागेवर सर्वांना परवडेल असे नाट्यगृह असावे, ही शहरवासीयांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय, सांस्कृतिक भवनाचे खराब झालेले फ्लोअरिंग, प्रकाश आणि ध्वनी व्यवस्था दुरुस्त केली जाईल. यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आगामी अर्थसंकल्पात केली जाईल. अखिल भारतीय नाट्य परिषद या मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे आणि नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी प्रास्ताविकातून या दोन्ही सभागृहांच्या दुरुस्ती व उभारणीचा मुद्दा मांडला होता. यावर महापौरांनी मनपा प्रशासनाच्या योजना स्पष्ट केल्या. येथील पीडीएमसी परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारपासून राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरू झाली. माजी महापौर तथा सभागृह नेते चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अ. भा. नाट्य परिषदेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे, बाल रंगभूमीचे अध्यक्ष मंगेश बक्षी, सांस्कृतिक संचालनालयाचे वसंतराव खडसे, गोविंद देशपांडे, परीक्षक जुईताई बर्वे, संजय पाटील, श्याम शिंदे, सुरेश गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. सभागृह नेते चेतन गावंडे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, अमरावतीतील कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरसेवक आणि नाट्य परिषदेचा सदस्य म्हणून मी सतत पाठपुरावा करेन. राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रथमच अमरावतीत होत आहे. या निमित्ताने आठवडाभरात राज्यातील अनेक बालकलावंत येथे येणार आहेत. दररोज सहा ते सात याप्रमाणे एकूण ४३ नाटकांचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाईल. कार्यक्रमाचे संचालन ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी केले, तर नाट्य परिषदेचे सहकार्यवाह मिलींद कहाळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *