![]()
तुम्ही ‘एक फूल दो माली’ सिनेमा पाहिला असंल किंवा त्याविषयी माहिती तर असंलच. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘एक फूल तीन-तीन माली’ असं काहीसं सुरू झालंय. आधीच चिंध्या झालेल्या राजकारणाच्या आणखी चिरफळ्या उडणार असं दिसतंय. आधीच एकमेकांपासून अंतर राखणारी महाविकास आघाडी आणखी फुटणार. त्याचं बीज या दावेदारीत आहे, बरं का. काय झालं की, परवाच्या दिवशी विधिमंडळाच्या कँटीनमध्ये जेवणाच्या टेबलावर पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांशी गप्पा झाल्या. थोड्या वेळानं काँग्रेसचाही विदर्भातील एक नेता सहभागी झाला. त्यांच्याकडून कळलं की, १६ मार्चला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत एका जागेवर आता काँग्रेसही दावा करणारंय म्हणे. या दाव्यानं उद्धव ठाकरेंची चिंता वाढणार, यात मला तरी काही शंका वाटत नाही. बरं, त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे राज्यसभेच्या एका जागेसाठी आवश्यक असणारी ३६ किंवा ३७ मते मिळवण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकते. त्यांना पाहिजे असलेली काही मतं महायुतीतून दिली जातील, अशी शक्यता आहे. आत्ता बोला? काँग्रेसचे बळ वाढवणे गरजेचे : वडेट्टीवार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारही आक्रमक झाले आहेत. त्यांचे मुद्दे असे. } काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. } काँग्रेसचे राज्यसभेत संख्याबळ वाढवणे आवश्यक आहे. } देशातील राजकीय समीकरणे पाहता राज्यसभा काँग्रेसलाच हवी आहे. ८५ वर्षांचे पवार राज्यसभेसाठी इच्छुक आहेत का, यावर सर्व राजकारण ठरेल सार्वजनिक जीवनातून निवृत्त होणार असे वारंवार सांगणारे ८५ वर्षांचे शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत काय, यावर पुढील सर्व राजकारण ठरणार आहे. शरद पवारांच्या उमेदवारीला उद्धवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता नाही. पण अलीकडेच संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये संघर्ष सुरू झाल्याने तसे काही होऊ शकते. अर्थात शरद पवार मैदानात उतरणार असतील तर उद्धवसेनेच्या २० मतांना बाजूला ठेवून पवारांना निवडून आणण्याचे डावपेच आखले जात आहेत. राज्याच्या राजकारणात उद्धवसेनेच्या मदतीची आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला फारशी गरज राहिलेली नाही, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्याचाच प्रयोग राज्यसभा निवडणुकीत केला जाऊ शकतो. त्या दृष्टीने शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच शरद पवारांशी बंद दाराआड चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभेवर आमचाच हक्क : आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे सध्या राज्यसभेसाठी सक्रिय झाले आहेत. ते म्हणाले } मित्र पक्षांकडून मोठे नाव समोर आले, तर आमची हक्काची जागा जाऊ शकते } संसदेत उबाठाचा आवाज हवा } काँग्रेसचे रोटेशन अमान्य. राज्यसभेतील जागेवर आमचाच हक्क.
राज्यसभेसाठी काँग्रेसच्याही दाव्याने वाढली ठाकरेंची चिंता:एका जागेसाठी दावेदार 3, त्यात मविआ फुटीचं बीज दडलंय बरं…
