कांतारा, केरळचा पारंपरिक कलाविष्कार:मिरवणुकीतील अघोरी नृत्याने वेधले लक्ष, बार्शीत शिव-बसव जयंती मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर
.

बार्शीमध्ये शिव-बसव जयंतीच्या मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे कांतारा व केरळमधील प्रसिद्ध पारंपरिक नृत्यप्रकार, अघोरी नृत्याने लक्ष वेधले. हा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सादर झालेल्या या नृत्यप्रकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही मिरवणूक उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
बार्शी येथे महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिव-बसव जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी सतरावा पुट्टा गणेश मंदिर येथे माजी आमदार राजेंद्र राऊत व बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार वर्षा ठोंबरे यांच्या हस्ते आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे, नेते भाऊसाहेब आंधळकर आदि उपस्थित होते.
मुलींच्या झांज पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण शिव-बसव जयंती मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत रणगंधर्व झांज-ढोल पथक, लेझीम पथकांनी उत्साहपूर्ण सादरीकरण केले. लेझीम पथकात मुलींचाही सहभाग होता.
