![]()
क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे नवनवीन रोजगार निर्मितीचा मोठा आधार आहेत, असे प्रतिपादन एनएएसडीएक्यूमध्ये कार्यरत असलेले तज्ज्ञ आनंद मेहता यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विभाग, एडब्ल्यूएस क्लाऊड क्लब आणि इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्लाउड आणि जनरेटिव्ह एआय’ या विषयावर एक दिवसीय विशेष तांत्रिक कार्यशाळा पार पडली. शैक्षणिक सिद्धांत आणि उद्योगातील बदलत्या गरजांमधील दरी कमी करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यातून विद्यार्थी आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान आणि जागतिक उद्योगातील अनुभवांची ओळख करून देण्यात आली. आनंद मेहता यांनी आपल्या मार्गदर्शनात एडब्ल्यूएस फाउंडेशन, क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या मूलभूत संकल्पना आणि एडब्ल्यूएसच्या विविध सेवांची सखोल माहिती दिली. त्यांनी वास्तविक जगात आणि विविध उद्योगांमध्ये एआयचा प्रभावी वापर कसा केला जातो, यावर प्रकाश टाकला. तसेच, फिनऑप्स, क्लाऊडवरील खर्च कमी करणे, आर्थिक व्यवस्थापन कौशल्ये, करिअर रोडमॅप आणि क्लाऊड व एआय क्षेत्रातील करिअरच्या संधी व अपेक्षा याबद्दलही सविस्तर माहिती दिली. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या नेतृत्वात, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वी झाली. इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मो. अतिक, विभागातील शिक्षक, इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव, व्यवस्थापक अमोल हिरुळकर, नरेश मोवाळे, रवी ढेंगळे, भावेश वारके, संतोष मालधुरे, एडब्ल्यूएस क्लाऊड क्लब कॅप्टन यश साठे व प्रणव शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेत संगणकशास्त्र विभागातील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सर्व सहभागींना एडब्ल्यूएसकडून प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. आनंद मेहता हे सध्या एनएएसडीएक्यूमध्ये कार्यरत असून, एडब्ल्यूएसचे कम्युनिटी बिल्डर, ‘फिनऑप्स’ आणि एआय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून मल्टि-क्लाउड आर्किटेक्चर आणि एंटरप्राइझ स्तरावरील तंत्रज्ञानावर सखोल संशोधन केले आहे.
क्लाऊड कॉम्प्युटिंग, एआय नवरोजगार निर्मितीचा मोठा आधार:अमरावती विद्यापीठात तज्ज्ञ आनंद मेहता यांचे मार्गदर्शन
