धर्मसत्ता अन् राज्यसत्ता एकत्र आल्याशिवाय विकास शक्य नाही:श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, हा आमचा हट्ट, उद्योजक बाबासाहेब काळे यांचे प्रतिपादन
![]()
“श्रीरामपूर तालुक्याला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील, तर या शहराला ‘जिल्हा’ घोषित करणे ही आता काळाची गरज आहे. ज्यावेळी धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र येते, तेव्हाच खऱ्या अर्थाने अर्थसत्ता आणि विकासाची गंगा वाहते, असे प्रतिपादन उद्योजक बाबासाहेब का
.
श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर आयोजित विराट हिंदू संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या ऐतिहासिक संमेलनाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (अयोध्या) चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योजक काळे यांनी श्रीरामपूरच्या औद्योगिक पिछाडीवर बोट ठेवले. ते म्हणाले, पूर्वी येथे कारखानदारीमुळे समृद्धी होती, मात्र आज चित्र बदलले आहे. डॉ. जयंतीभाई आपण केंद्र व राज्य सरकारचे ‘राजदूत’ म्हणून आमची ही जिल्ह्याची मागणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत पोहोचवावी. महंत रामगिरी महाराजांच्या माध्यमातून आणि सरकारच्या सहकार्याने श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, हा आमचा हट्ट आहे.
अयोध्या राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले, हिंदुत्वाच्या विशाल गंगेतला मी एक बिंदू आहे, हे भान प्रत्येक हिंदूने ठेवावे. अंतकरणात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि विचार जपले, तरच देशाची प्रगती होईल. छत्रपती शिवरायांच्या विचारांनीच आपल्या जीवनाची पावले प्रगतीच्या दिशेने पडली पाहिजेत.” अशा उपक्रमांतूनच राष्ट्राला नवी प्रेरणा मिळते. डॉ. जयंतीभाई भाडेसिया म्हणाले, आज जग भारतीय संस्कृतीचा स्वीकार करत असताना आपण आपल्या संस्कारांपासून दूर जाणे चिंतेचे आहे. केवळ शासन सर्व समस्या सोडू शकत नाही; शक्तिशाली समाजच देशाला सामर्थ्यवान बनवू शकतो. त्यांनी निसर्गपूजा आणि सामाजिक समरसतेचे आवाहन केले. या संमेलनासाठी संपूर्ण जिल्ह्यातून वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. थत्ते मैदान भगवेमय झाले होते. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण श्रीरामपूर शहर दुमदुमून गेले होते.
