Tulja Bhavani Temple Rule | भाविकांसाठी महत्वाची बातमी! तुळजाभवानी मंदिर परिसरात ‘हे’ कृत्य केल्यास थेट दंड होणार
Tulja Bhavani Temple Rule | धाराशिव जिल्ह्यातील तुळजा भवानी मंदिर (Tulja Bhavani Temple) परिसरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मंदिर परिसरात तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली असून 24 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई COTPA Act अंतर्गत करण्यात आली असून संबंधितांकडून एकूण 4,650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा रुग्णालय आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या पथकाने मंदिर प्रशासनाच्या मदतीने अचानक तपासणी मोहीम राबवली. मंदिर परिसर आणि प्रशासकीय इमारतीत तपासणी करत तंबाखू सेवन करणारे तसेच तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली.
या मोहिमेचा उद्देश मंदिर परिसर स्वच्छ आणि तंबाखूमुक्त ठेवणे हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Tulja Bhavani Temple Rule | व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याची सुविधा:
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांसाठी व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर परिसरात कोणी तंबाखू किंवा गुटखा खाताना दिसल्यास नागरिक त्याचे फोटो काढून प्रशासनाला पाठवू शकतात.
तक्रार मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर तात्काळ आणि कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Tulja Bhavani Temple Rule)
तसेच मंदिर परिसरात स्वच्छता राखणे आणि पवित्रता टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे भाविकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानकडून करण्यात आले आहे.
