![]()
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी ‘पुणे फर्स्ट’ या आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी तीन पक्षांवर पुणे शहराचे लचके तोडल्याचा आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला.
.
चव्हाण म्हणाले की, पुण्यातील उद्योग, वाहतूक समस्या आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक उद्योग पुणे सोडून जात आहेत. नवीन उद्योगांची गुंतवणूक पुण्यात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकार अनेक गुंतवणुकीच्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक दिसत नाही. उद्योगांना पुण्यात यायचे असले तरी नागरी सुविधा कोलमडल्यामुळे सेमीकंडक्टरसारखे उद्योग येथे येत नाहीत. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारमुक्त सरकार देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीने गुरुवारी काँग्रेस भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षाचा डिजिटल जाहीरनामा देखील प्रकाशित करण्यात आला. माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चौधरी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर आणि शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
चव्हाण यांनी पुढे सांगितले की, पुण्यात वाहतूक समस्यांचे निवारण केले जाईल. मेट्रोचे भूमिपूजन आम्ही पाठपुरावा करून पुण्यात आणले आणि ते पूर्ण केले. मी मुख्यमंत्री असताना मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो आणण्याचा निर्णय घेतला, याचे कागदोपत्री पुरावे आहेत. त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच नाही. घोषणा करण्यासाठी पैसे लागत नाहीत, पण चुकीच्या पद्धतीने योजना राबवून सत्ताधारी भ्रष्टाचार करत आहेत. शहरातील भाजपने स्मार्ट सिटी योजना गुंडाळली आहे.
एकेकाळी शिक्षण आणि रोजगारात पुणे अग्रणी होते, पण सध्या तशी परिस्थिती दिसत नाही. सर्वत्र महायुती असली तरी निवडणुकीत तसे चित्र राहणार नाही. देशात दोन विचारधारा कायम असून जनतेने गांधींच्या विचारधारेस पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बायोडायव्हर्सिटीबाबत आम्ही गांभीर्याने निर्णय घेतले होते, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केल्याने टेकड्या नष्ट होत आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर त्यावर पुन्हा काम करू. ‘लाडकी बहीण’ योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेल्याने अनेक गैरप्रकार घडले आहेत, असेही चव्हाण म्हणाले.
