कर्जबाजारीपणामुळे शफेपुरात शेतकऱ्याने केली आत्महत्या




कर्जबाजारीमुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शफेपूर भागात घडली आहे. भगवान मारोती मोकासे (५२) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी भगवान मोकासे यांनी शेतातील गव्हाच्या पिकावर औषध फवारणी करून येतो, असे पत्नी व मुलांना सांगून ते शेतात गेले होते. त्यानंतर त्यांनी शेतातच विषारी औषध प्राशन केल्याचे समोर आले. काही वेळाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तत्काळ मोकासे यांना पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांच्या माहितीनुसार, बचत गटाचे कर्ज, खासगी कर्ज तसेच हातउसनी रकमेचा वाढता ताण यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार दत्तू लोखंडे व वसंत पाटील करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *