![]()
आगामी विकसित भारताची खरी ओळख आजची युवाशक्ती आहे, असे प्रतिपादन भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ४२ व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जनरल पांडे म्हणाले की, आजची तरुण पिढी केवळ देशाचे नागरिक नसून, ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा अविभाज्य भाग आहे. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रांतील नेतृत्वाची धुरा तरुणांच्या खांद्यावर असेल. युवाशक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी त्यांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रगती ही बदलाशी जोडलेली असते, त्यामुळे जुन्या विचारसरणीला आव्हान देऊन नवनवीन कल्पनांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. “केवळ प्रयत्न करून थांबू नका, तर परिणामांवर आणि सकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करा,” असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जनरल पांडे यांनी ‘तीन सी’ चा मंत्र दिला. चरित्र (Character), क्षमता (Competence) आणि आचरण (Conduct) हे यशाचे तीन आधारस्तंभ आहेत. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि नैतिक धैर्य हे उत्तम माणसाचे लक्षण आहे, जे योग्य मार्ग निवडण्यास मदत करेल. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले. शिस्त, सांघिक कार्य आणि सहानुभूती या गुणांमुळे समाजात वेगळी ओळख निर्माण करता येते. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दीक्षांत समारंभात गुणवत्तेत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. एकूण पदकांपैकी ८० टक्के पदके मुलींना, तर २० टक्के पदके मुलांना मिळाली.
विकसित भारताची खरी ओळख युवाशक्ती:माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा दीक्षांत समारंभात संदेश
