वेरूळ लेण्यांचे पुण्यात 'एलोरामा' प्रदर्शन:ललित कला अकादमी पुरस्कार विजेते नीलेश काळे यांच्या कलाकृती
![]()
पुण्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळच्या कैलास मंदिर आणि जैन व बौद्ध लेण्यांवर आधारित ‘एलोरामा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ललित कला अकादमी पुरस्कार विजेते छायाचित्रकार नीलेश काळे यांनी काढलेल्या पॅनोरामा छायाचित्रांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कला दालनात मंगळवार, २८ एप्रिल ते रविवार, ३ मे दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पुणेकरांसाठी खुले राहील. या प्रदर्शनात वेरूळ लेण्यांवर आणि विशेषतः कैलास मंदिरावर विविध अंगांनी प्रकाश टाकणारी छायाचित्रे पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘फोटोग्रॅमी’ किंवा ‘फोटोग्रॅमेट्री’ या तंत्राचा वापर करून काढलेल्या निवडक छायाचित्रांचा यात समावेश आहे. या तंत्रज्ञानाने बनवलेले अचूक थ्रीडी (त्रिमिती) मॉडेल हे प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ‘एलोरामा’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. जागतिक कीर्तीचे मूर्तीशास्त्रज्ञ आणि कैलास मंदिरावरील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, खासदार प्रो. मेधा कुलकर्णी आणि प्रसिद्ध कलाकार जयंत जोशी यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. यावेळी डॉ. गो. बं. देगलूरकर उपस्थितांशी संवाद साधतील. प्रदर्शनादरम्यान गुरुवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता इंडोलॉजिस्ट डॉ. राहुल देशपांडे हे देखील ‘एक्स्प्लोरिंग एलोरा’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. छायाचित्रकार नीलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रकुटांनी कोरलेल्या वेरूळमधील कैलास मंदिराचा कालखंड इ.स. ७५६ ते इ.स. ७७३ दरम्यानचा आहे. सुमारे २ किलोमीटर परिसरात ३४ गुंफा कोरलेल्या आहेत. त्यापैकी क्रमांक १६ चे कैलास मंदिर हे एकाच खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठे अखंड देऊळ (मोनोलिथीक मंदिर) म्हणून ओळखले जाते. थ्री डी व्हिस्टा आणि क्लाऊड कम्पेअर तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लेणी कुठून पाहायला सुरुवात करावी, प्रत्येक टप्प्यावर काय बघावे, त्याची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण काय आहे, तसेच त्याची अचूक लांबी, रुंदी, उंची किती आहे, या सर्वांची माहिती प्रदर्शनात मिळेल. या जागतिक वारशाची एक ‘संचलित सफर’ अर्थात ‘व्हर्च्युअल टूर’ उपस्थितांना अनुभवता येईल, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.
