इ-शिवाई चालकाने प्रवाशांचा मौल्यवान ऐवज परत केला:प्रामाणिकतेबद्दल वाहतूक नियंत्रकांनी सत्कार करून कौतुक केले




इ-शिवाई बसचे चालक विवेक बोंडे यांनी कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांनी बसमध्ये विसरलेला मौल्यवान ऐवज प्रामाणिकपणे परत केला. त्यांच्या या कृतीबद्दल इ-शिवाईचे वाहतूक नियंत्रक राजेश विजयकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इ-शिवाई बसमध्ये ७ फेब्रुवारी रोजी एका प्रवाशाची बॅग विसरली होती. चालक विवेक बोंडे यांना बॅगेची तपासणी करताना त्यात एक लॅपटॉप आणि पैशाचे पाकीट आढळले. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा त्यांच्या बसमध्ये एका प्रवाशाने आपली पैशाने भरलेली पर्स विसरली. बोंडे यांनी दोन्ही घटनांमध्ये कोणताही लोभ न बाळगता, संबंधित प्रवाशांशी संपर्क साधून वरिष्ठांच्या समक्ष तो ऐवज परत केला. या प्रामाणिक कार्याबद्दल अमरावती आगारात इ-शिवाईचा कारभार सांभाळणारे वाहतूक नियंत्रक राजेश विजयकर यांनी चालक बोंडे यांचा सत्कार करून कौतुक केले. इतर चालक-वाहकांनीही या आदर्श कृतीतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन विजयकर यांनी यावेळी केले. या सत्कार समारंभाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार, तसेच अधिकारी श्रीकांत देवरे, नंदकिशोर काळे, हर्ष कोसे, रोशन शेख, सत्यम राजगुरे, रोशन सरकटे, सुपरवायझर आदित्य सहारे, विनायक सपाटे आणि पवन सपाटे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *