एनकाऊंटरची हवा, रिल्सचा तमाशा आणि कबुतर भोवती फिरणारे प्रश्न!
नांदेड (प्रतिनिधी) – शहरात गुन्हेगारीपेक्षा चर्चा जास्त कशाची असेल तर ती म्हणजे रिल्सची! अरिजितसिंग खून प्रकरणातील आरोपी शेख शाहरुख उर्फ कबुतरला पोलिसांनी अटक केली आणि लगेचच सोशल मीडियावर काहींनी कल्पनाशक्तीचे पंख लावून थेट एनकाऊंटर पर्यंत झेप घेतली.
पोलीसांनी 20 तारखेच्या रात्री कबुतराला अटक केली, 21 एप्रिलला पत्रकार परिषद घेतली आणि न्यायालयानेही त्याला पोलीस कोठडी सुनावली. सगळं काही कायदेशीर मार्गाने चालू असताना अचानक सोशल मीडियावर एक रिल अवतरली आणि त्यात कबुतरच्या कुटुंबातील महिलांच्या तोंडून एनकाऊंटरचा शब्द बाहेर पडला. जणू काही न्यायालय, पोलीस आणि कायदा यांना विश्रांती देऊन थेट चित्रपटाचा क्लायमॅक्स सुरू झाला!
आता प्रश्न असा पडतो की, ही रिल तयार करणारे शेख याहिया आणि सय्यद तन्वीर यांना अचानक एवढं प्रेम का उचंबळून आलं? नांदेडमध्ये पत्रकारांची कमी नाही, पण नेमकं ह्याच दोन व्यक्तींनाच हा एक्सक्लुझिव्ह का मिळाला? की ही काही फॅमिली पॅक माहिती होती? कबुतरवर MPAD ची कार्यवाही प्रस्तावित असल्याची माहिती स्वतः पोलीस अधीक्षकांनी सांगितली आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आरोपीला पकडल्याचं सर्वश्रुत आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या कारवायांमुळे काहींच्या कल्पनांना कदाचित जास्तच खतपाणी मिळालं असावं. पण त्यामुळे कुणाचाही एनकाऊंटर ठरवण्याचा अधिकार सोशल मीडिया युनिव्हर्सला मिळतो का, हा खरा प्रश्न आहे.
एकीकडे पोलीस सांगतात की आरोपीला हैदराबादहून आणलं, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली; आणि दुसरीकडे रिल्समध्ये एनकाऊंटरची स्क्रिप्ट लिहिली जाते. म्हणजे सत्य एकीकडे आणि व्हायरल कंटेंट दुसरीकडे – कोणावर विश्वास ठेवायचा, हा प्रेक्षकांसाठीच प्रश्नचिन्ह! या सगळ्या प्रकरणात सर्वात मजेशीर म्हणजे, जिथे एनकाऊंटर होण्याचा प्रश्नच नाही, तिथे त्याची चर्चा करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे की फक्त व्ह्यूज वाढवण्याचा फंडा, हे मात्र तपासाचं विषय ठरू शकतं.
शेवटी एवढंच –
नांदेडमध्ये सध्या कायदा आपलं काम करत आहे, पण काही जणांना बहुधा रिल्स मध्येच न्याय द्यायची घाई झाली आहे! कबुतर उडतंय की उडवलं जातंय, यापेक्षा कोण कोणाच्या सोबत उडतंय, हे शोधणं आता पोलिसांसाठी अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातमी ….
