आयत्या बिळावरील नागोबांनी बुद्धीवर बोलू नये!:रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांना 'संतवाणी'तून प्रत्युत्तर, वडिलांवरील टीकेचा घेतला समाचार
![]()
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष रोडून राष्ट्रवादीत गेले, तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? असा खोचक सवाल वाघ यांनी केला होता. त्यानंतर रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आता रोहिणी खडसे यांनी थेट संत तुकारामांच्या संतवाणीतून वाघ यांच्यावर प्रहार केला आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, ज्यांचा बुद्धीशी काडीचाही संबंध नाही अशा ‘चित्रा’विचित्र लोकांनी बुद्धी विषयी न बोललेले बरे! माझ्या वडिलांवर बोलण्याआधी लक्षात ठेवा की ज्या पक्षात तुम्ही आमदार म्हणून मिरवत आहात. त्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यात माझ्या वडिलांचा वाटा आहे. आयत्या बिळावरील नागोबांनी जरा बुद्धीवर जोर देऊन बोलावे, असा खोचक टोला खडसे यांनी लगावला आहे. पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, अशा ‘चित्र’विचित्र लोकांसाठी तुकोबाराय म्हटलेत,
आयत्या बिळावरी नागोबा वसे ।
परिश्रम न करी, मान मात्र हसे ।। दुसऱ्याच्या घामावर उभारे दरबार ।
काळ आला म्हणे, झाला मी शहाणार ।। कर्माविण फुशारकी किती दिवस जाई ।
सत्याच्या उजेडी खोटे रूप पाही ।। तुका म्हणे ज्याचे कष्ट त्याचे फळ ।
उगीच्याच्या मिरवणुकीचे होते विटाळ ।। अशा पद्धतीने रोहिणी खडसे यांनी थेट संत तुकाराम यांच्या संतवाणीतून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. तसेच पुढे खडसे म्हणाल्या, आम्ही जन्मतः संघर्ष करतो आहोत आणि आता संघर्षच निवडला आहे. त्यामुळे लढण्याच्या बाता आमच्या समोर नका मारू. कारवाई होईल या भीतीने आम्ही मैदान सोडले नाही. त्यामुळे महिलांचा प्रश्न असो व या देशातील नागरिकांना हक्काचा आम्ही आजही मैदानात आहोत, कालही होतो आणि उद्याही राहू, असे खडसे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट:चित्रा वाघ यांची रोहिणी खडसेंवर टीका; रोहिणींनी ‘चित्रा विचित्र’ म्हणत साधला होता निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर महिला आरक्षणाच्या मुद्यावर चर्चेचे आव्हान दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आव्हान स्वीकारले होते. पण चित्रा वाघ यांनी फडणवीस हे त्यांच्या बरोबरीच्यांशी बोलतील असे म्हणत त्यांचे आव्हान टोलवून लावले होते. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सुप्रिया सुळे यांनी आव्हान स्वीकारल्यामु्ळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका केली होती. तसेच चित्रा वाघ यांचा उल्लेख त्यांनी चित्रा-विचित्र असाही केला होता. यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्यावर पलटवार केला. वाचा सविस्तर
