![]()
28 जानेवारी रोजी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणालाही पचनी पडत नाहीये. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली असून, आज मुंबईतील वरळी डोम येथे अजित दादांच्या स्मृतीप्रत्यर्थ एका भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राजकीय नेते, विविध क्षेत्रांतील दिग्गज आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दिग्गज कलाकार नाना पाटेकरही शोकसभेत उपस्थित आहेत. उपस्थितांना संबोधित करताना नाना पाटेकर भावुक झाले असल्याचे पाहायला मिळाले. शोकसभेत बोलताना नाना पाटेकर म्हणाले, नमस्कार..माझा आणि दादांचा 50 वर्षांचा संबंध. दादा कार्यकर्ते होते. मी कधी बारामतीला गेलो, तर माझी सगळी उठबस दादा पाहत होते. अजित दादा तेव्हा 18-19 वयोगटातील असतील, मी 25 आणि शरद पवार 35 वयोगटातील असतील. 50 वर्षांचा खूप मोठा सहवास आहे. खूप जास्त आठवणी आहेत, असे पाटेकर म्हणाले. तसेच आज या ठिकाणी इतकी मंडळी जमली आहेत, शोकसभेच्या ठिकाणी जर दादांचा आज 75वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो, तर जास्त बरे वाटले असते, असेही यावेळी नाना पाटेकर म्हणाले. अजितदादांच्या शोकसभेसाठी माजी सरन्यायाधीश भूषण गवई, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनीही उपस्थिती लावली. यादरम्यान, एका बाजूला उद्योगपती मुकेश अंबानी, दुसऱ्या बाजूला उद्योगपती गौतम अदानी आणि मध्यभागी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल बसल्याचे दिसून आले. तसेच अंबानी यांच्यासोबत गप्पा देखील मारल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवारांच्या शोकसभेत नाना पाटेकर भावुक:आजूबाजूला अंबानी-अदानी, मध्यभागी प्रफुल्ल पटेल; अनेक दिग्गजांची उपस्थिती
