![]()
निगडी येथील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने ११ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. हा फसवणुकीचा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार हे पूर्वी चाकण एमआयडीसी येथील एका कंपनीचे संचालक होते. नोव्हेंबर महिन्यात त्यांच्याशी एका मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क साधण्यात आला. आरोपींनी स्वतःला नामांकित गुंतवणूक संस्थेचे प्रतिनिधी भासवले. शेअर बाजारात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी कंपनीला ‘सेबी’ मान्यता असल्याचा दावा करत बनावट प्रमाणपत्रही पाठवले. त्यानंतर तक्रारदाराला एका ऑनलाइन ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये इतर सदस्य स्वतःला गुंतवणूकदार भासवून शेअर बाजारातील ट्रेंड, आयपीओ आणि ट्रेडिंग रणनीतीवर चर्चा करत होते. आरोपींनी दिलेल्या लिंकवरून तक्रारदाराने एक मोबाईल ॲप डाउनलोड केले. या ॲपमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळत असल्याचे दाखवण्यात येत होते. सुरुवातीला सुमारे ४० लाख रुपयांचा नफा खात्यात जमा झाल्याचे दिसल्याने तक्रारदाराचा विश्वास अधिक वाढला. यानंतर व्यावसायिकाने स्वतःच्या व्यवसायातील हिस्सा विकून आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले. नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत त्यांनी एकूण ११ कोटी रुपये हस्तांतरित केले. मात्र, जेव्हा त्यांनी मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी कर, प्रोसेसिंग फी आणि खात्याच्या पडताळणीसारख्या सबबी सांगत आणखी पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार दाखल केली. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक कारवाईत पोलिसांनी सुमारे ७० लाख रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे. डिजिटल ट्रेल, आयपी ॲड्रेस आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी ऑनलाइन गुंतवणुकीबाबत विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन गुंतवणुकीने व्यावसायिकाला 11 कोटींचा गंडा:तीन महिन्यांपासून सुरू होता फसवणुकीचा सुनियोजित प्रकार
