अमरावती विद्यापीठात मुलींचा दबदबा, तिघींनी जिंकली 19 सुवर्णपदके:42,317 विद्यार्थ्यांवर मात करत निकीता, पल्लवी, तेजस्वीनी आणि साईश्वरी अव्वल




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बेचाळीसाव्या दीक्षांत समारंभात यंदाही विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व सिद्ध केले. तब्बल ४२,३१७ विद्यार्थ्यांवर मात करत पहिल्या तीन स्थानांवर मुलींनी बाजी मारली. नेर परसोपंत येथील निकीता पुनसे, वाशिमची पल्लवी राठोड आणि शेगावच्या तेजस्वीनी भगतसह अमरावतीच्या साईश्वरी इंदुरकर यांचा यात समावेश आहे. या चौघींनी मिळून एकूण १९ सुवर्णपदके पटकावली. नेहरु कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नेर परसोपंत येथील निकीता किशोर पुनसे हिने सर्वाधिक ६ सुवर्ण व एक रोख पारितोषिक जिंकले. आर.ए. कला, एम.के. वाणिज्य व एस.आर. राठी विज्ञान महाविद्यालय, वाशिम येथील पल्लवी बालकृष्ण राठोड हिने ५ सुवर्ण, एक रौप्य आणि एक रोख पारितोषिक पटकावले. तर, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील तेजस्विनी विठ्ठल भगत आणि विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथील साईश्वरी सत्यजित इंदुरकर या विद्यार्थिनींनी प्रत्येकी ४ सुवर्ण पारितोषिके प्राप्त केली. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना सोमवारी झालेल्या दीक्षांत समारंभात भारतीय सैन्य दलाचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, आयक्युएसी संचालक डॉ. संदीप वाघुळे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. विजय मानकर आणि उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर उपस्थित होते. दीक्षांत संदेश देताना जनरल पांडे यांनी आजच्या तांत्रिक युगावर भाष्य केले. ते म्हणाले की, तंत्रज्ञान आपली क्षमता वाढवत असले तरी, भावनिक बुद्धिमत्ता आणि मानवी मूल्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तंत्रज्ञानाचा वापर करताना माणुसकी विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशात पालक आणि प्राध्यापकांच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे दूत आणि बदलाचे वाहक म्हणून जगात वावरले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कुलगुरु डॉ. बारहाते यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात विद्यापीठाची यशोगाथा सादर केली. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आहे. विद्यार्थ्यांनी या बदलांना घाबरून न जाता नवीन कौशल्ये आत्मसात करावीत. एआय हे रोजगाराची नवीन दालने उघडणारे तंत्रमित्र ठरेल, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने पदवी स्तरावरील सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमात ‘एआय’चा अनिवार्य घटक म्हणून समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुलभा पाटील व डॉ. प्रणव कोलते यांनी केले. पसायदानाने या दीक्षांत समारंभाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *