विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माजी स्थलसेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावर बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आज राहुल गांधी हे पुस्तक हातात घेऊन संसदेत दाखल झाले. परंतु संसद चाललीच नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संसदेत उपस्थित राहिले नाहीत. तज्ञांच्या मते, राहुल गांधी पुस्तकासह संसदेत येणार असल्याची माहिती आधीच असल्यामुळे हा टाळाटाळीचा प्रकार घडला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संसदेत बोलण्याची संधी न मिळाल्याने राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत त्या पुस्तकातील मजकूर मांडला. ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ मध्ये मनोज नरवणे यांनी चीनकडून होत असलेल्या घुसखोरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना विचारणा केली होती, मात्र त्यांना ठोस उत्तर मिळाले नाही, असा दावा पुस्तकात असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. यावर पंतप्रधानांनी तुम्हाला जे योग्य वाटते ते करा” असे उत्तर दिल्याचा उल्लेख पुस्तकात असल्याचे त्यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सरकारने जबाबदारी झटकली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराने राहुल गांधींना प्रश्न विचारला की, आपल्या मते पंतप्रधानांनी नेमके काय करायला हवे होते? त्यावर राहुल गांधी यांनी ती पत्रकार भाजपची प्रवक्ताच असल्याचा टोला लगावत उत्तर दिले की, ते स्वतः काही आरोप करत नाहीत, तर पुस्तकात नमूद केलेल्या बाबींचा संदर्भ देत आहेत. एवढे सांगून त्यांनी पत्रकार परिषद संपवली.
या पुस्तकात आणखी एक गंभीर दावा करण्यात आला आहे की, वरून आदेश मिळाल्याशिवाय चिनी सैन्याने भारतीय भूमीत घुसखोरी केली तरी गोळीबार करू नये, असा आदेश होता. गलवान संघर्षाच्या वेळी देखील चिनी सैन्याने काटेरी तार गुंडाळलेल्या दांड्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला, तरीही गोळीबार झाला नव्हता, ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे.
दरम्यान, संसदेत बोलण्यास राहुल गांधींना मज्जाव करण्यात आला असला, तरी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ज्या विषयावर बंदी घालण्याचा प्रयत्न होतो, तोच विषय अधिक चर्चेत येतो. नरवणे यांच्या पुस्तकावर पूर्वीपासूनच मर्यादा आणण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता या पुस्तकाची चर्चा देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुरू झाली आहे.या पुस्तकात नरवणे यांनी स्वःताला एकटे वाटत होते असे नमूद केलेले आहे.

याचवेळी संसद भवनासमोर मकरद्वाराच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी आंदोलन केले. पंतप्रधानांना लक्ष्य करणारे फलक हातात घेऊन ते बसले असताना केंद्रीय राज्यमंत्री रणवीत सिंह बिट्टू तेथे आले. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांना आओ मेरे गद्दार दोस्त असे म्हणत टोला लगावला. यावर संतप्त प्रतिक्रिया देत बिट्टू यांनी राहुल गांधींवर देशविरोधी असल्याचा आरोप केला आणि तेथून निघून गेले.
रणवीत सिंह बिट्टू यांचे राजकीय पार्श्वभूमी लक्षवेधी आहे. त्यांचे आजोबा बेअंत सिंह हे पंजाबचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसनेच त्यांना मुख्यमंत्री केले होते. 2007 मध्ये त्यांची हत्या झाली. बिट्टू यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे श्रेय राहुल गांधींनाच जाते. काँग्रेसने त्यांना 2009, 2014 आणि 2019 मध्ये खासदार बनवले. मात्र 2024 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांना मंत्रीपद देण्यात आले, आणि त्यानंतर त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका सुरू केली, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
दुपारी वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह स्थगित केले. मात्र या गोंधळात ओम बिर्ला यांनी लोकसभेला देशाचे उच्च सभागृह असे संबोधल्याचा आरोप विरोधकांनी केला. वास्तविक राज्यसभा हे देशाचे उच्च सभागृह असल्याने, या विधानावरूनही राजकीय वाद पेटला.
संसदेत गोंधळ घालण्याची परंपरा कोणी सुरू केली, यावरही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांच्या मते, वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करण्याची पद्धत भाजपनेच रूढ केली होती आणि आता विरोधी पक्ष त्याच पद्धतीचे अनुकरण करत आहेत. पूर्वी संसद न चालण्याबाबत भाजपवर आरोप होत असताना तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते, तर प्रश्न विचारणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते.
आज मात्र विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करताच त्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परिणामी, संसद चालू न देणे, प्रश्नांना उत्तरे टाळणे आणि टीका करणाऱ्यांना देशविरोधी ठरवणे, या सर्व घडामोडींमुळे लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
