![]()
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संस्थेचे नाव बदलून आता ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे करण्यात येणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवार यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव आणि आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी दूध संघाला त्यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला सर्व संचालकांनी एकमताने पाठिंबा दिला. अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला, विशेषतः दूध उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच पाठिंबा दिला. कात्रज दूध संघाच्या विस्तार योजना, पायाभूत सुविधांसाठी जमीन मिळवून देणे आणि प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. संघाच्या वार्षिक सभांना उपस्थित राहून त्यांनी संस्थेला व्यावसायिक शिस्त लावण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. या निर्णयाबाबत बोलताना, “हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता नसून, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि संस्थात्मक उभारणीचा हा सन्मान आहे,” असे सांगण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये त्यांचे स्मारक उभारण्याची चर्चा सुरू असतानाच, कात्रज दूध संघाने नामकरणाचा हा पहिला मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात अजित पवार यांचे नाव कायमस्वरूपी आदराने घेतले जाईल. या निर्णयाची प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर नामकरणाचा अधिकृत सोहळा आयोजित केला जाईल. कात्रज दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांनी या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “अजितदादांनी कायम दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच संघ आज प्रगतीपथावर आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा नामकरणाचा निर्णय घेतला आहे.”
कात्रज डेअरीला आता 'अजितदादा पवार' यांचे नाव:पुणे जिल्हा दूध संघाचा निर्णय, संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर
