वाई शहरालगत बिबट्याचा वावर:नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, रविवार पेठ परिसरातील कालवड व रेडकावर हल्ला




वाई शहरालगतच्या विराटनगर आणि रविवार पेठ परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यशवंतनगर येथील नंदनवन सोसायटीच्या मागील बाजूस गुरुवारी (दि. 15 ऑक्टोबर) मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्या मोबाइल कॅमेर्‍यात कैद झाला. दरम्यान, रविवार पेठ परिसरातील मळ्यात बिबट्याने कालवड आणि रेडकावर हल्ला केल्याची घटना पहाटे समोर आली आहे. या घटनांमुळे मानवी वस्ती आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील विराटनगर आणि नंदनवन सोसायटीच्या मागील बाजूस बांधकाम सुरू असलेल्या जागा, दाट झाडाझुडपांमुळे बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. या परिसरात मध्यरात्री बिबट्याचा वावर कॅमेर्‍यात कैद झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, रविवार पेठ परिसरातील मळ्यात अमोल अनिल बोडके यांच्या शेडजवळ कालवड आणि रेडकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ही दोन्ही जनावरे ठार झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील व सहकारी कर्मचारी यांच्याबरोबर घटना स्थळाची पाहणी केली असून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शेतकर्‍यांनी विशेष काळजी घ्यावी बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे. जनावरांना सुरक्षित बंदिस्त गोठ्यात ठेवावे आणि लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित अंतर राखून तातडीने वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याबाबत अफवा पसरवल्यास कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंतनगर-विराटनगर तसेच रविवार पेठ परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती खरी असून, वनविभागामार्फत संबंधित ठिकाणी पाहणी करून आवश्यक कार्यवाही सुरू आहे. वनविभागाची रात्रगस्तही वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. बिबट्या किंवा अन्य हिंस्र वन्यप्राणी दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. खोटी माहिती पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *