![]()
मोर्शीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे रविवार, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरली होती. या पावन पर्वावर खांद्यावर त्रिशूल घेऊन डफलीच्या तालावर नाचत-गाजत भाविकांनी सालबर्डी येथील भुयारात असलेल्या लहान महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या यात्रेत अमरावती जिल्ह्यासह चंद्रपूर, परभणी, वाशिम आणि नांदेड येथून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथील यात्रेला पहाडावरील हिरवीगार घनदाट झाडे आणि खळखळ वाहणाऱ्या नदीच्या निसर्गरम्य वातावरणाची साथ लाभली होती. सातपुडा पर्वत रांगेतील मध्यप्रदेशच्या हद्दीत असलेल्या प्राचीन शिवगुफेत सुमारे ७०० वर्षांपासून शिवलिंग आहे. या शिवलिंगावर बाराही महिने नैसर्गिकरित्या पाण्याचा जलाभिषेक सुरू असतो, जो विज्ञान युगातील एक अविष्कार मानला जातो. या मार्गावरील नैसर्गिक देखावे अत्यंत विलोभनीय आहेत. येथे ‘माता सीतेची न्हानी’ या नावाने एक जलकुंड आहे, जिथे आजही गरम आणि थंड पाणी अनुभवास मिळते. सीतेने याच ठिकाणी लव-कुश या जुळ्या बाळांना जन्म दिला अशी आख्यायिका आहे. नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या या स्थळाला बाराही महिने पर्यटक भेट देतात. ज्या ठिकाणी प्राचीन शिवगुफा आहे, तेथे मध्यप्रदेश सरकारतर्फे यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची आणि विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. सालबर्डी मार्गावर संत महादेव महाराज आणि संत मारुती महाराज यांची मंदिरे असून, मंदिराच्या विश्वस्तांकडून यात्रेकरूंसाठी फराळ आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोर्शी-पाळा-सालबर्डी मार्गावर विविध संघटनांद्वारे जागोजागी उसळ, फराळी चिवडा, शरबत आणि चहापाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. या मार्गावरून केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश देण्यात आला होता, तर एसटी बस, चारचाकी आणि जड वाहनांची वाहतूक दापोरी-हिवरखेड मार्गाने वळविण्यात आली होती. या यात्रा महोत्सवात आकाश पाळणे, मौत का कुवा, सिनेमा टॉकीज, हॉटेल्स, स्टेशनरी साहित्याची दुकाने, चणे-फुटाण्याची दुकाने, पितळी भांड्यांची दुकाने, दगडी जात्यांची दुकाने तसेच लाकडी वस्तूंची दुकाने उभारण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने मोर्शी, वरूड, परतवाडा, हिंगणघाट, अमरावती, आर्वी, यवतमाळ आणि नागपूर येथून एसटी गाड्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षी काही जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या हत्तीडोहाच्या आजूबाजूला बांबूचे कुंपण घालण्यात आले होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्शी तसेच आठनेर पोलिसांच्यावतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
सालबर्डीत महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा जनसागर उसळला:सातपुडा पर्वतातील प्राचीन शिवगुफेत दर्शनासाठी मोठी गर्दी
