बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून कार नदीपात्रात कोसळली; महिलेचा मृत्यू


पतीने पोहत गाठला नदीकाठ; घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू

कंधार (प्रतिनिधी) –  कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून टाटा पंच कार नदीपात्रात कोसळून झालेल्या दुर्घटनेत पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४०, रा. सावरगाववाडी, ता. मुखेड) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती लक्ष्मण संभाजी गुट्टे (वय ५०) हे पोहता येत असल्याने नदीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उपचार करून परतताना दुर्घटना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण गुट्टे हे बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करतात. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी ते पत्नी पार्वती यांना किरकोळ आजारावरील उपचारासाठी खासगी कारने नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले होते. उपचारानंतर दोघेही आपल्या सावरगाववाडी या गावी परतत होते. दरम्यान, कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून त्यांची एमएच २६ सीवाय २६३५ क्रमांकाची टाटा पंच कार नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पार्वती गुट्टे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर लक्ष्मण गुट्टे यांनी पोहत नदी बाहेर येत आपला जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी कंधार ग्रामीण रुग्णालय गाठल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांकडून शोधकार्य व तपास

घटनेची माहिती मिळताच कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश जुमडे आणि पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात कोसळलेली कार बाहेर काढणे तसेच महिलेचा शोध घेण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असल्या, तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

दोन मुली व एका मुलाच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले

मृत पार्वती गुट्टे यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे गुट्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *