आता 'गाव तिथे एसटी' नव्हे, 'आदिवासी पाडा तिथे एसटी'!:राज्य परिवहन मंडळाची घोषणा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती




सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा असोत की मेळघाटचे दुर्गम भाग, आता प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत ‘लालपरी’ पोहोचणार आहे. ‘केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आता आदिवासी पाडा तिथे एसटी’ असा ठाम निर्धार करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जारी केलेल्या पत्रकानुसार, सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी च्या चाकांनी मोजले जाणार आहे. राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. ‘आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,’ असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरु केल्याची घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मिडी बसेस विकासाची नवी वाट राज्य परिवहन महामंडळ 9 मीटर लांबीच्या, 35 आसनी अशा 100 अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करीत असून या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली. आज तब्बल 93 टक्के लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. मोठ्या बसेसना तिथे प्रवेश शक्य नव्हता; त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. आता मात्र ही पायपीट थांबणार आहे. पायवाटांवरून चाकवाटांकडे.. ही केवळ बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ बस म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे. मंत्री सरनाईक यांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, दुर्गम भागातील आपला आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे. विकासाचा नवा संकल्प ‘लालपरी ‘च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संर्धीची नवी पहाट दडलेली असेल. असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *