![]()
कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील शेतकऱ्याच्या दोन गटातील एकूण चार एकर जमीनीची बनावट दस्ताऐवज तयार करून परस्पर विक्री करणाऱ्या चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसोड येथील एका सातव नावाच्या शेतकऱ्याची मसोड शिवारातील गट क्रमांक ५३ मध्ये दोन एकर जमीन आहे. तसेच गट क्रमांक ७८ मध्ये दोन एकर जमीन आहे. सदर चार एकर जमीन ते वहिती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. या जमीन विक्रीबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारचा करारनामा केला नाही तसेच जमीनीची विक्रीही केली नाही. दरम्यान, सदर गावातील काही व्यक्तींनी या दोन्ही गटातील बनावट कागदपत्रे तयार केली. त्यांनतर हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात या जमीनीचे खरेदीखत नोंदविले. या खरेदीखत नोंदवित असतांनी त्यांनी जमीनीच्या मालकाचे छायाचित्र व आधारकार्ड देखील तयार करून लावले. या कागदपत्रांच्या आधारावर ता. ३१ जानेवारी रोजी या चार एकर जमीनीचे खरेदीखत नोंदविण्यात आले होते. सदर प्रकार मुळ मालक असलेल्या सातव यांना समजल्या नंतर त्यांनी तातडीने सहदुय्यम निबंधक कार्यालय गाठून खरेदीखताच्या प्रती काढल्या. यामध्ये त्यांची जमीन परस्पर विक्री करण्यात आल्याचे दिसून आले. यावर त्यांनी सहदुय्यम निबंधक संजय सुंकवाड यांना याबाबत माहिती दिली. यावरून सुंकवाड यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी कान्होपात्रा भालेराव, माधव भालेराव (रा. मसोड), शाम सोळंके (रा. कळमनुरी) याच्यासह अन्य एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक वाघमारे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शंकर ठोंबरे, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.
बोगस आधारकार्ड आणि फोटो लावून जमिनीचे खरेदीखत:शेतकऱ्याची 4 एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपली; चौघांवर गुन्हा दाखल
