नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी शनिवारी सकाळी गोदावरी नदीपात्रात अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपशावर मोठी कारवाई करत ७ लाख २५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी अवैध उपसा करताना सापडलेली इंजिने आणि तराफे तोडून नष्ट केले, तर जप्त केलेली वाळू पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली.
पोलीस उपा अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आज सकाळी अकरा वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार जाधव, शेख आसिफ आणि शेख जमीर यांच्या पथकाने विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रावर छापा टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध उपसा कारवाईत एक इंजिन (किंमत अंदाजे तीन लाख रुपये), आठ तराफे (किंमत अंदाजे चार लाख रुपये) आणि अंदाजे पाच ब्रास वाळू (किंमत अंदाजे २५ हजार रुपये) असा एकूण सात लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडून आला.
सापडलेले इंजिन आणि तराफे हे अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येत असल्याने, पोलिसांनी घटनास्थळीच ते तोडून जाळून नष्ट केले. तर, नदीकाठी साठवून ठेवलेली पाच ब्रास वाळू ही खाजगी वाहनाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली आहे.
या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अवैध खनिज उपशा आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चिंचोळकर करत आहेत.
संबंधित व्हिडीओ ..

Post Views: 216
