सायबर फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांत एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक; नांदेड पोलिसांकडून तपास सुरू


नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये सायबर सेल आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पहिल्या प्रकरणात, सिडको परिसरातील निलेश प्रभाकर वासमवार यांच्या बँक ऑफ बडोदा खात्यात ९ लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यापैकी २० हजार रुपये एटीएमद्वारे तर ८ लाख ८० हजार रुपये चेकद्वारे काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. संबंधित खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी केल्याप्रकरणी सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात, काबरानगर येथील कैलास दत्तात्रय लिंगायत यांच्या नांदेड मर्चंट्स बँकेच्या खात्यात फसवणुकीची २१ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समोर आले. या खात्याचाही वापर सायबर गुन्ह्यातील रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप असून सायबर सेलमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तिसऱ्या प्रकरणात, महालक्ष्मी क्लोथिंग कंपनी व कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या व्यवहारांच्या माध्यमातून फिर्यादीच्या येस बँक खात्याचा गैरवापर करून तब्बल ८४ लाख ६६ हजार ६६४ रुपये इतर खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच टी-शर्ट व्यवसाय वाढवून देण्याचे खोटे आश्वासन देत फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी राजेंद्र दुबे, आयुष, सनी सिंह (रा. कोलकाता) आणि विजय घटके (रा. गोपाळ चावडी, नांदेड) यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिन्ही प्रकरणांचा तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे तसेच वजिराबाद पोलीस करीत असून, सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे


Post Views: 8






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *