सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा:उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासन निर्णय जारी, 31 ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश




अमरावतीसह राज्यभरातील शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, ३१ ऑगस्टपूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षक तथा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश खेरडे आणि इतरांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शासनाने १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, पदोन्नतीसाठीची ‘कट ऑफ डेट’ १ सप्टेंबर २०२५ ठरवण्यात आली होती. या तारखेपर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार होते, ज्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ग्राह्य मानून १४ मे २०२६ चा शासन निर्णय रद्द केला. हा निकाल १० जुलै २०२६ रोजी जाहीर झाला. त्यानंतर १९ दिवसांनी, २९ जुलै रोजी, नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयामुळे ‘कट ऑफ डेट’चा गुंता सुटला असून, राज्यातील पात्रताधारक सेवाज्येष्ठ शिक्षकांवरील अन्याय दूर झाला आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, तातडीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक होण्याच्या दिनांकापर्यंत ‘टीईटी’ किंवा ‘सीटीईटी’ पात्रता धारण करणारे सर्व शिक्षक आता पदोन्नतीसाठी पात्र ठरतील. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, शिक्षण विस्तार अधिकारी, समूह साधन समन्वयक, मुख्याध्यापक आणि विषय शिक्षक यांची पदोन्नती प्रक्रिया नव्याने सुरू केली जाईल. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डीपीसीची बैठक घेऊन, संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे कडक निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. शिक्षकांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेचा यशस्वी युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अक्षय नाईक आणि ॲड. अश्विन देशपांडे यांनी केला. या याचिकेमध्ये जिल्हाध्यक्ष मंगेश खेरडे यांच्यासह प्रशांत उंडे, मनोज चोरपगार, सतीश डोंगरे, राजू खिराडे, अमोल वऱ्हेकर, दत्तप्रसाद भेले, संतोष राऊत, डॉ. ज्ञानेश्वर मोहोड, मनीष दिघेकर, संतोष तामस्कर, प्रशांत रोहनकर, राजेश खाडे, अर्चना मेश्राम, विजया झाडे, ज्योत्सना हिरडे आणि प्रकाश रामटेके आदी सहभागी होते. या शासन निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यासह राज्यातील २९ जिल्ह्यांतील सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. भविष्यात पात्र होणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी जानेवारी २०२७ पासून कालबद्ध वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *