![]()
संवेदना फाउंडेशनतर्फे पुण्यात एपिलेप्सी (फिट्स) रुग्णांसाठी स्नेहमेळावा आणि वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ मार्च २०२६ रोजी नवी पेठ येथील निवारा हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. संस्थेने फेब्रुवारी २०२६ मध्ये आपल्या कार्याची २२ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला जात आहे. सकाळचा स्नेहमेळावा सर्व वयोगटातील रुग्ण, त्यांचे पालक आणि हितचिंतकांसाठी खुला असेल. यानंतर आयोजित केलेला वधू-वर मेळावा एपिलेप्सीचा इतिहास असलेल्या, स्वावलंबी आणि विवाहयोग्य युवक-युवतींसाठी असणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ डॉ. सुजीत जगताप मार्गदर्शन करतील, तर संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या संस्थापक संचालक यशोदा वाकणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फेब्रुवारी २००४ मध्ये पहिली बैठक घेऊन सुरू झालेल्या संवेदना फाउंडेशनने गेली दोन दशके एपिलेप्सी रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला आहे. एपिलेप्सी हा मेंदूचा विकार असून, मेंदूतज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार घेतल्यास तो नियंत्रणात राहू शकतो. योग्य उपचारांनी रुग्ण शिक्षण, नोकरी आणि वैवाहिक आयुष्यही सुरळीत जगू शकतात. मात्र, समाजात या आजाराबद्दल असलेले गैरसमज आणि सामाजिक कलंक यामुळे अनेक जण आपला आजार लपवतात. यामुळे त्यांना शाळेत प्रवेश नाकारणे, नोकरीत अडथळे आणि विवाहात अडचणी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्या रुग्णांच्या फिट्स औषधांनी थांबत नाहीत, त्यांच्यासाठी मेंदू शस्त्रक्रिया हा पर्यायही उपलब्ध आहे. संस्थेतर्फे एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप मीटिंग्ज, समुपदेशन केंद्रे, विवाह मंडळ, वधू-वर मेळावे आणि गरजू रुग्णांना औषध मदत योजना असे विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांचा हजारो कुटुंबांना लाभ झाला आहे. संस्थेने सुरू केलेल्या एपिलेप्सी वधू-वर मंडळाने आजवर ३० विवाह यशस्वीरित्या घडवून आणले असून, संबंधित कुटुंबे आनंदी जीवन जगत आहेत. या कार्यक्रमाबद्दल किंवा संस्थेच्या कार्याबद्दल अधिक माहितीसाठी ९८२२००८०३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पुण्यात एपिलेप्सी रुग्णांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन:स्नेहमेळावा आणि वधू-वर मेळावा 1 मार्च रोजी होणार
