छत्रपती शिवरायांची तुलना धर्मांध 'टिपू'शी नको:हर्षवर्धन सपकाळांचा जाहीर निषेध, प्रकाश महाजनांची जोरदार टीका




मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख आणि उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर, उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. सपकाळ यांच्या या विधानावर सत्ताधारी भाजप नेत्यांनी कडाडून टीका केल्यानंतर, आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ यांचा मी जाहीर निषेध करतो. तसेच टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्या मालेगावमधील उपमहापौरांना शासनाने नोटीस काढावी, त्यांचे पद रद्द केले पाहिजे. तसेच देशद्रोही टिपू सुलतानचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. राज्य व देशातील कॉंग्रेसचे दुर्दैव की त्यांना सपकाळ यांच्यासारखे नेते मिळाले. छत्रपती शिवरायांची तुलना धर्मांध ‘टिपू’शी नको, अशांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कदापी होऊ शकणार नाही. टिपू सुलतान देशद्रोही होता. दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेतील वादग्रस्त छायाचित्र प्रकरणावर उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी एका स्वागत समारंभात केले. यामुळे मालेगाव शहरात पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे राज्य आणि देशपातळीवर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर, आता मनपा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, नगरसचिवांनी शासन आदेशाचा हवाला देऊन राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे लावण्याबाबतचे अधिकृत पत्र महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांना जारी केले आहे. राजकीय वातावरण तापल्यामुळे प्रशासनाने तातडीने नियमावली स्पष्ट करत हे पाऊल उचलले असून, आता केवळ शासनमान्य राष्ट्रपुरुषांचेच फोटो दालनात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *