नांदेड (प्रतिनिधी)- शहरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. शहरातील विविध मारुती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सूर्योदयाच्या वेळी बजरंग बलीची विधीवत आरती करण्यात आली. आरतीनंतर भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
शहरातील अनेक मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी भजन-कीर्तन, नामस्मरण तसेच भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण अधिक मंगलमय झाले. नागरिकांनी छोट्या-छोट्या गटांमध्ये एकत्र येत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला. भक्तांनी “बजरंग बली की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. रांगा व्यवस्थीत ठेवून प्रत्येक भक्ताला शांततेत दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेलाही प्राधान्य देण्यात आले.हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरात धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. भक्तांच्या उत्साहामुळे नांदेड शहर दिवसभर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

Post Views: 31
