![]()
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना पटसंख्ये अभावी टाळे लावण्यात आले असून यामध्ये औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळा तर हिंगोलीतील कन्या शाळेचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच हि वेळ आल्याचा आरोप पालकांतून केला जात आहे. तर यामुळे निपुण हिंगोली अभियानाला चपराक बसली आहे. हिंगोली जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मागील काही वर्षात गुणवत्ता वाढीच्या नावाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातून पटसंख्या वाढणे अपेक्षीत असतांना तालुक्याच्या ठिकाणची असलेली औंढा नागनाथ येथील शाळा व जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली कन्या शाळा बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषद कन्या शाळा सुरु करण्यात आली होती. हिंगोली शहरातील जून्या भागात सुमारे ६० वर्षापुर्वी सुरु असलेल्या शाळेत शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची मोठी संख्या होती. त्यानंतर हि शाळा हिंगोली शहरातील बहुविध प्रशालेच्या बाजूला स्थलांतरीत झाली. मात्र या शाळेतील पटसंख्येकडे शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाल्याने या शाळेची पटसंख्या यावर्षी २० पेक्षाही कमी झाली. त्यानंतर यावर्षी हि शाळा बंद करण्यात आली. या शाळेतील विद्यार्थीनींना बहुविध प्रशालेत प्रवेश देण्यात आला असून शिक्षकांचे इतर ठिकाणी समायोजन करण्यात आले. दरम्यान, औंढा नागनाथ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शाळा होती. मात्र मागील चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच १० ते १५ विद्यार्थीच प्रवेश झाले होते. त्यानंतर यावर्षी शाळेत एकही प्रवेश झाला नसल्याने हि शाळाही बंद करण्यात आली आहे. दोन्ही शाळांना टाळे लावण्यात आले आहे. शिक्षण खात्याच्या दुर्लक्षाने शाळा बंद करण्याची वेळ – गणेश देशमुख, पालक औंढा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सोयीची शाळा होती. मात्र शिक्षण खात्याच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा मिळाल्या नाही त्यामुळे अखेर शाळा बंद करावी लागली. पटसंख्या कमी झाल्याने शाळा बंद झाली – आसावरी काळे, शिक्षणाधिकारी औंढा नागनाथ जिल्हा परिषद शाळा पाचवी पासून ते दहावी पर्यंत असली तरी या ठिकाणी आठवी पासून ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी होते. यावर्षी एकही विद्यार्थी नसल्याने शाळा बंद केली. तर हिंगोलीच्या कन्या शाळेतील विद्यार्थीनीचे बहुविध प्रशालेत प्रवेश करून अतिरिक्त शिक्षकांचे सवना, शिरडशहापूर येथील शाळेत समायोजन केले.
पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना टाळे:निपुण हिंगोली अभियानाला चपराक, शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
