![]()
नागपुरात सध्या पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. शहरातील रस्ते नद्यांसारखे वाहू लागले असून, या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका खामला परिसरातील ‘सोमलवार शाळेला’ बसला. शाळेच्या मैदानात चक्क तळ्यासारखे पाणी साचल्याने निष्पाप चिमुकले, शिक्षक आणि काही पालक आतच अडकून पडले. अखेर गुडघाभर पाण्यातून वाट काढत या विद्यार्थ्यांचे थरारक ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करण्यात आले असून, प्रशासनाच्या या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेला आले तलावाचे स्वरूप नागपुरात सकाळपासूनच पावसाने झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे खामला येथील राणाप्रताप नगर मार्गावरील ‘सोमलवार स्कूल’च्या आवारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. शाळेच्या मैदानात तब्बल दोन ते अडीच फूट पाणी साचले आहे. पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की, विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आलेल्या स्कूल व्हॅन आणि इतर वाहनेही या पाण्यात अडकून पडली आहेत. विद्यार्थ्यांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन शाळेत गुडघाभर पाणी साचल्याने लहान मुले, शिक्षक आणि काही पालक शाळेच्या इमारतीतच अडकून पडले. पाण्याची पातळी वाढत असल्याने अखेर अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढत, मुलांना उचलून सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाकडून केले जात आहेत. नागरिकांचा प्रशासनावर संताप या संपूर्ण परिस्थितीला स्थानिक प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. राणाप्रताप नगर रोडवर सध्या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. प्रशासनाच्या याच दिरंगाईमुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, आणि हे पाणी थेट शाळेत घुसले. “प्रशासनाच्या चुकीची शिक्षा आज या निष्पाप चिमुकल्यांना भोगावी लागत आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांनी आणि नागरिकांनी दिल्या आहेत. शिक्षकांची आणि पालकांची प्रशासनाकडे मागणी शाळेतील भयानक परिस्थिती पाहता, प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी पालकांनी केले आहे. अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणांनी अधिक वेगाने कार्यवाही करावी आणि साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करावा, अशी मागणी शाळेतील शिक्षक आणि पालकांनी प्रशासनाला केली आहे. हेही वाचा.. राज्यात पावसाचा धुमाकूळ!: कोकण, घाटमाथा, विदर्भासह अनेक भागांना अलर्ट, धरणसाठ्यातही मोठी वाढ; वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा
नागपुरात तुफान पाऊस:सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे रेस्क्यू ऑपरेशन- VIDEO
