मोर्शीत कत्तलीसाठी नेले जाणारे 32 गोवंश वाचवले:दोन आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल




मोर्शी येथे कत्तलीसाठी अवैधरीत्या नेल्या जाणाऱ्या ३२ गोवंशांची पोलिसांनी सुटका केली आहे. मोर्शी ते चांदूरबाजार रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्शी पोलिसांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, ठाणेदार राहुल आठवले यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गोवंश जनावरांची पाहणी केली असता, त्यांच्या कानांना पिवळ्या व गुलाबी रंगाचे टॅग दिसले. ही जनावरे अनिल शिरभाते (वय ३९, रा. हिवरखेड) आणि आकाश आमले (वय ३४, रा. पारडशिंगा) हे दोघे हाकत होते. त्यांच्या चौकशीत, ही जनावरे मोर्शी येथील शेख अयुब शेख युसुफ यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जनावरांच्या कानांवरील टॅगची खात्री केली असता, एकूण ४७ जनावरांपैकी केवळ १५ जनावरांचे टॅग वैध असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित ३२ जनावरांचे टॅग अनधिकृत होते. त्यामुळे, १५ वैध जनावरे शेख अयुब शेख युसुफ यांना परत करण्यात आली, तर ३२ अनधिकृत जनावरांना चारा-पाण्यासाठी येरला येथील गौरक्षण संस्थेत दाखल करण्यात आले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या या मार्गाने मध्यप्रदेशातून अवैध जनावरांची तस्करी सुरू असून, शासनाने गो-तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी वेगळा कायदा आणावा, अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राहुल आठवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिसन नांदगावकर, निरंजन उकंडे, उमेश ढेवले, विलास कोहळे आणि मनोज गायकी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *