![]()
सातारा शहर परिसरातील म्हाडा कॉलनी तामजाईनगर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छेविरुध्द विवाह लावून देऊन तिच्याशी शारिरीक संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याप्रकरणी तेथीलच पाच जणांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. १६ वर्षी युवतीने याबाबत सातारा शहर पोलिसांत तक्रार दिली असून गेल्यावर्षी दि. २५ जानेवारी २०२५ ते नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकार घडला. घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी रुपाली शहाजी वाघमोडे, शहाजी संपत वाघमोडे रा देवकरवाडी, पो. निगडी, ता. जि. सातारा, शैला शंकर शिंगाडे, शंकर कमलाकर शिंगाडे, सोमनाथ शंकर शिंगाडे, सर्व. रा. म्हाडा कॉलनीजवळ , तामजाईनगर, क्षेत्रमाहुली ता. जि. सातारा असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांची माहिती अशी की, वरील संशयितांनी फिर्यादी मुलगी ही वयाने लहान व अल्पवयीन असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांनी दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सोमनाथ शिंगाडे याचे सोबत म्हाडा कॉलनी तामजाई माळ क्षेत्रमाहुली ता. जि. सातारा येथे लग्न लावून दिले. त्यानंतर पती सोमनाथ शिंगाडे यांनी माहे नोव्हेंबर मध्ये सातारा येथे घरी आलेनंतर पत्नी लहान व अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याने ती दहा आठवडयांची गरोदर राहिल्याने फिर्यादी युवतीने सातारा शहर पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. महिला पोलिस कर्मचारी भालेकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. शिवथर (ता. जि. सातारा) येथील दादा जयसिंग माने यांच्या शेताशेजारील मधून ८० किलो तांब्याची तार लंपास सातारा तालुक्यातील शिवथर (इंगवले वस्ती, फरशी ओढा) परिसरातील डीपीतून अज्ञात चोरट्याने सुमारे २४ हजार रुपये किंमतीची तांब्याची तार चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांची माहिती अशी की, मौजे शिवथर येथील डीपीतील सुमारे ८० किलो वजनाची, अंदाजे २४ हजार रुपये किमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने महावितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना दादा जयसिंग माने यांच्या शेताशेजारी घडली. याप्रकरणी फिर्यादी प्रविण टोणपे (वय ३६, व्यवसाय – कनिष्ठ तंत्रज्ञ, बाह्य स्त्रोत, म.रा.वि.वि. कंपनी मर्या., शाखा – वडथ, रा. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत. बंदीवानाकडून शिवीगाळ दमदाटी सातारा जिल्हा कारागृह येथे शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दवाखाना विभागासमोर एका न्यायाधीन बंदीवानाने शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित बंदीवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह शिपाई संजय पवार (वय – ४२) यांनी तक्रार दिली आहे. संशयित आरोपी म्हणून न्यायाधीन बंदी गजानन युवराज जाधव (मुळ. रा. खेड, ता. जि. सातारा; सध्या रा. सातारा जिल्हा कारागृह) याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांची माहिती अशी की, येथील दवाखाना विभागासमोर संबंधित बंदीवान हा तुरुंग अधिकारी श्रीमती कुंटे यांच्याकडे एकटक पाहत उभा होता. त्याला नीट उभे राहण्यास सांगितल्यावर त्याने संतापून अश्लील शिवीगाळ करत अंगावर धाव घेत ढकलाढकली केली. दरम्यान, कारागृह शिपाई पवार यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्या शर्टची कॉलर पकडून मारहाण केली व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. संबंधित संशयितांवर याप्रकरणी शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ व मारहाणीबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील अधिक तपास करत आहेत. गर्भपातात अति रक्तस्राव झाल्याने मृत्यू बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. २० जानेवारी २०२६) सायंकाळी दाखल करण्यात आलेल्या १८ वर्षीय तरुणीचा शनिवारी (दि.१४) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. गर्भपातादरम्यान झालेल्या अति रक्तस्रावामुळे व त्यानंतर रक्त संक्रमण झाल्याने मृत्यू झाल्याचे ॲडव्हान्स प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. मनिषा अनिल वाघमारे (वय – १८, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या घटनेतील तरुणीचे नाव आहे. याबाबतची खबर डॉ. दळवी यांनी बारामती उपजिल्हा रुग्णालयातून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी दि. २० जानेवारीला फलटण येथील काम आटोपून आपल्या गावी जात असताना तिला अति रक्तस्राव होत असल्याने तातडीने बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावली आणि शनिवारी दि. १४ फेब्रुवारीला तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर तरुणी कातकरी समाजातील असून अशिक्षित व ग्रामीण भागातील असल्याने तिला डॉक्टरांना सविस्तर माहिती देता आली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मारहाणीबाबत वैद्यकीय कायदेशीर अहवाल (एमएलसी) कळविला होता. मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले असून पंचनाम्याच्या ॲडव्हान्स प्रमाणपत्रात गर्भपातातील अति रक्तस्राव व रक्त संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पोलीस हवालदार खाडे पुढील तपास करत आहेत.
सातारा क्राइम:अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याने 5 जणांवर गुन्हा; पीडिता 10 आठवड्यांची गरोदर
