जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी संघटन मजबूत करा:जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे आवाहन, काँग्रेस भवनात संघटनात्मक बैठक




आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी संघटना मजबूत करण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले आहे. अमरावती येथील काँग्रेस भवनात रविवारी झालेल्या संघटनात्मक आढावा बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. या बैठकीचे आयोजन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, प्रकाशराव काळबांडे, महिला काँग्रेसच्या कांचनमालाताई गावंडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, रामेश्वर अभ्यंकर, प्रवीण मनोहर आणि दयाराम काळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बबलू देशमुख यांनी सांगितले की, आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा फडकवणे हा आपला निर्धार आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गावपातळीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. बूथ प्रमुखांनी आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून मतदारांशी सातत्याने संपर्क साधावा. विरोधकांना आपली ताकद दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. संघटनात्मक बांधणी, नव्या कार्यकर्त्यांची नोंदणी आणि गावनिहाय नियोजन यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार बळवंतराव वानखडे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, संघटनेची मजबुती हीच निवडणूक विजयाची गुरुकिल्ली आहे. ग्रामीण भागात काँग्रेसची पकड अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. जनतेच्या प्रश्नांवर लढा देत भाजपला त्यांची जागा दाखवण्याची हीच खरी वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये विजयी झालेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा सत्कारही करण्यात आला. या बैठकीला कृऊबासचे सभापती हरीश मोरे, संजय वानखडे, सुनील गावंडे, श्रीकांत बोंडे, साहेबराव भदे, नामदेवराव तनपुरे, बाबाराव बहुरूपी, श्रीकांत झोडपे, दिनेश वानखडे, श्रीधरराव काळे, प्रमोद दाळू, राजू कुरेशी, अनिकेत ढेंगळे, राजेंद्र नागपुरे, सतीशराव हाडोळे, समाधान दहातोंडे, बाबूभाई इनामदार, शोएब खान, राहुल गवई, अमोल होले, सच्चिदानंद बेलसरे, राजेश सेमलकर, वैभव वानखडे, सिद्धार्थ बोबडे, श्रीनित राऊत यांच्यासह तालुका व शहर पदाधिकारी, बूथ प्रमुख, युवक व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *