Revenue official beaten up and sand truck stolen | महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करून वाळूचा ट्रक पळवला: तिवसा-कुऱ्हा मार्गावर घडला प्रकार, चालक-मालकासह दोघांवर गुन्हा – Amravati News



तिवसा ते कुऱ्हा मार्गावर महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान जप्त केलेला वाळूचा ट्रक कर्मचाऱ्याला मारहाण करून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महसूल सहाय्यक राहुल शंकरराव निस्वादे यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी ट्रकचालक, मालकासह दोन अज्ञातांव

.

ही घटना ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. तिवसा महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना, अंजनसिंगीमार्गे कुऱ्ह्याकडे येणारा एमएच ४९ सीडी ८७३७ क्रमांकाचा दहा चाकी ट्रक थांबवण्यात आला. तहसीलदार डॉ. मयूर कळसे, नायब तहसीलदार आशीष नागरे, महसूल सहाय्यक राहुल निस्वादे, ग्राम महसूल अधिकारी चरणसिंग दुलत आणि महसूल सेवक सूरज माथुलकर यांनी तपासणी केली असता, ट्रकमध्ये अवैध वाळू आढळून आली. त्यामुळे तहसिलदारांनी ट्रक जप्त करून तिवसा तहसील कार्यालयात नेण्याचे निर्देश दिले.

ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जात असतानाच, एक भरधाव स्विफ्ट डिझायर कार ट्रकच्या आडवी आली. कारमधील दोन अज्ञात व्यक्ती आणि ट्रक मालक खाली उतरले. त्यांनी महसूल सहाय्यक निस्वादे यांची कॉलर पकडून त्यांना बाहेर ओढले, मारहाण केली आणि ट्रकमधील वाळू रस्त्यावर टाकून ट्रक पळवून नेला.

या घटनेनंतर महसूल सहाय्यक निस्वादे यांनी तात्काळ तहसीलदार यांना माहिती दिली आणि कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, चांदुर रेल्वे येथील ट्रकमालक लक्ष्मण चौधरी, ट्रकचालक आणि दोन अज्ञातांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुऱ्हा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या घटनेबाबत तिवसा तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांनी माहिती दिली की, एकाच रात्री दोन ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, त्यापैकी एक ट्रक कर्मचाऱ्याला मारहाण करून पळवण्यात आला. त्यांनी सांगितले की, ट्रकचालक व मालकाविरुद्ध कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, आरटीओ आणि ईटीपीला हा ट्रक ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *