Find joy in expressing your words and feelings through calligraphy. | आपले शब्द, भावना सुलेखनातून मांडून आनंद मिळवा: पद्मश्री अच्युत पालव यांचा चिंचवडमध्ये प्रेक्षकांशी संवाद – Pune News
![]()
पद्मश्री अच्युत पालव यांनी चिंचवडमध्ये सांगितले की, शब्द केवळ लिहायचे नसतात, तर त्यामागील भावना व्यक्त करायची असते. सुलेखनातून आपले शब्द आणि भावना मांडून आनंद मिळवता येतो. कलेच्या माध्यमातून व्यक्त झाल्याने जीवन सोपे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
.
चिंचवड येथील एकबोटे फर्निचर स्टुडिओमध्ये अच्युत पालव यांनी सुलेखनातून साकारलेल्या भिंतीच्या १४ व्या उत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालव यांनी निवडक प्रेक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी संचालक नरेंद्र एकबोटे, सुहास एकबोटे, श्रद्धा पालव, ज्येष्ठ कलाकार विकास गायतोंडे, अमोल कुलकर्णी यांच्यासह कला आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्थेच्या आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन पालव यांच्या हस्ते करण्यात आले. कलाकार विनोद कोचर यांनी पालव यांचे पिंपळाच्या पानावर काढलेले चित्र त्यांना भेट म्हणून दिले.
श्रद्धा पालव यांनी प्रेक्षकांच्या वतीने प्रश्न विचारून अच्युत पालव यांना बोलतं केलं. यावेळी उपस्थितांना एका सुलेखनकारापासून पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा पालव यांचा जीवनप्रवास अनुभवता आला. त्यांनी बीड जिल्ह्यातील वाडी-वस्तीवरील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जमिनीचा फळा म्हणून वापरून केलेला सुलेखनाचा सराव, ८५ वर्षांच्या परदेशी महिलेने देवनागरी लिपी शिकण्यासाठी पॅरिस ते लंडन केलेला रेल्वे प्रवास, गुलजार यांच्या घरी स्वतःची सुलेखनाची वही पोहोचवण्यासाठी केलेली धडपड आणि त्यानंतर मिळालेली शाबासकी, तसेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी दिल्लीत झालेली भेट व त्यांचे आशीर्वाद यांसारखे अनेक समृद्ध अनुभव त्यांनी सांगितले.
‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा सुलेखनावर काय परिणाम होईल, या प्रश्नावर उत्तर देताना अच्युत पालव म्हणाले की, विचार फक्त माणूसच करतो. रेषा अनुभवता यायला हव्यात. अक्षरे तुमच्याशी बोलतात, त्यामुळे तुम्हीही त्यांच्याशी संवाद साधा. केवळ वाचून काढणे आणि वाचून घडणे यात फरक असतो. नाट्य कलाकार जसा नाटक वाचून नंतर ते सादर करताना घडवतो, तसेच सुलेखनात भावना महत्त्वाच्या असतात. शिकण्याला वय नसते, त्यामुळे कायम शिकत राहावे, असेही पालव यांनी नमूद केले.
