मुंबईचे प्रश्न वाऱ्यावर, महापौरांचे लक्ष बांगलादेशींवर:घुसखोरी झाली असेल तर ते केंद्राचे अपयश नाही का? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल




मुंबईतील रस्ते, कचरा आणि प्रदूषणासारख्या नागरी समस्यांनी मुंबईकर त्रस्त असताना, महापौर आणि सत्ताधारी भाजप केवळ ‘बांगलादेशी घुसखोरी’च्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याची बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. “जर देशात खरोखरच बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे घुसले असतील, तर ते केंद्रातील भाजप सरकारचे आणि सीमा सुरक्षा दलाचे अपयश नाही का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारण्याआधीच आपण अनधिकृत बांगलादेशी विरोधात मोहीम हाती घेणार असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले होते. मुंबईला आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावे लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे, असे रितू तावडे म्हणाल्या होत्या. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांची यादी मांडली. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा! चांगलं आहे पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होतेय; खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा…बरं, पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपने ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. जर हे खरे असेल, तर बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले? ते भारताच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजलदरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले? इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचे सरकार आहे! ह्या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे अपयश? की प्रशासकीय अपयश? उत्तर एकच, भाजप, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते POK घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे! जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले? ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *