सियाचीनच्या युद्धभूमीपेक्षा महाराष्ट्रातील कारखाने अधिक धोकादायक का?:नुकसान भरपाईत भेदभाव नको; नागपूरप्रमाणे चंद्रपूरच्या जखमींनाही 25 लाख द्या- सुधीर मुनगंटीवार




नागपूर येथील स्फोट प्रकरणातील जखमींना देण्यात आलेल्या भरपाईचा उल्लेख करत त्यांनी चंद्रपूरमधील दालमिया सिमेंट अपघातातीलग्रस्तांसाठीही समान न्यायाची मागणी केली. नागपूरमधील अपघातातील जखमींना तुम्ही 25 लाख रुपयांची मदत दिली, त्याबद्दल तक्रार नाही. मात्र, चंद्रपूरच्या दालमिया सिमेंट कंपनीत ॲसिड अपघातात जे कामगार जखमी झाले, त्यांनाही हीच 25 लाखांची राशी मिळणार का? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. हाय कम्पेनसेशन केवळ नागपूरपुरते मर्यादित न ठेवता ते संपूर्ण राज्यासाठी समान असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुनगंटीवार म्हणाले की, जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीनमध्ये दरवर्षी हवामानामुळे जवळपास 16 जवानांचा मृत्यू होतो. आपल्याकडे तसे हवामान नसतानाही केवळ औद्योगिक अपघातांत दरवर्षी 25 हून अधिक कामगारांचा बळी जातो, ही गंभीर बाब आहे. गेल्या 10 वर्षांत अशा किती प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आणि प्रत्यक्षात किती दोषींवर कठोर कारवाई झाली, याचा लेखाजोखा त्यांनी मागितला. आमदारांची विशेष समिती हवी औद्योगिक अपघातात कामगारांचा बळी गेल्यानंतर केवळ गुन्हे दाखल करून काहीच साध्य होत नाही, अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सध्याच्या कायदेशीर चौकटीतील त्रुटींवर बोट ठेवले. अशा प्रकरणांत दोषींना खरोखर शिक्षा होण्यासाठी त्यांनी ‘आमदारांची विशेष समिती’ स्थापन करण्याची आग्रही मागणी केली आहे. 302 चा गुन्हा दाखल करता येत नाही मुनगंटीवार म्हणाले की, कंपनीतील कामगाराच्या मृत्यू प्रकरणी तांत्रिकदृष्ट्या कलम 302 (खूनाचा गुन्हा) दाखल करता येत नाही. मी जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूमिका मांडली होती, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला अत्यंत समर्पक उत्तर दिले होते की, अशा प्रकरणांत कायद्याच्या चौकटीत शिक्षा होणे कठीण असते. आजवर अशा औद्योगिक अपघातांच्या किती प्रकरणांत प्रत्यक्षात कुणाला कठोर शिक्षा झाली? असा सवाल करत त्यांनी केवळ गुन्हे दाखल करणे हा ‘टाईमपास’ असल्याचे सुचवले. दिल्ली-मुंबईत जाऊन दानधर्म करतात मुनगंटीवार म्हणाले की, लोक (कंपन्या) कारखान्यांमध्ये कामगारांचे जीव घेतात आणि मुंबई-दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन मोठे दानधर्म करतात. हा विरोधाभास थांबला पाहिजे. दालमिया असो वा इतर कोणतीही कंपनी, ते काही भरचौकात उभे राहून आपली चूक मान्य करणार नाहीत किंवा माफी मागणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर धाक निर्माण करणारी यंत्रणा हवी. दालमिया सिमेंट कारखाना अपघाततील जखमींना भरघोस मदत द्यावी- वडेट्टीवार चंद्रपूर येथील दालमिया सिमेंट कारखान्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेतं या घटनेनंतर प्रशासकीय अनास्था आणि कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. चंद्रपूर सिमेंट कंपनीत झालेल्या अपघात दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.नागपूर प्रमाणे त्यांनाही 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी. केवळ आश्वासने न देता ठोस मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *