Sushma Andhare Questions BJPs Anger Over Ajit Pawar Plane Accident


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवार हे राज्याची संपत्ती होते. त्यामुळे त्यांच्या विमान अपघातावर प्रश्न विचारला तर भाजपला राग का येतो?

.

सुषमा अंधारे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील एका प्रचारसभेत बोलताना भजापवर उपरोक्त प्रश्नांची सरबत्ती केली. त्या म्हणाल्या, मी प्रचाराचे काही बोलणार नाही. कारण, सोन्यासारखा माणूस आपल्यातून निघून गेला. अजितदादा राज्याची संपत्ती होते. ते म्हणतात ना की, लाख जावो, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचा राज्यातील प्रत्येक माणसाला हक्क आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती उड्डयण नियामक मंडळाने दिली पाहिजे. पण भाजपच वेगळी उत्तरे देत आहे. या प्रकरणी अनेक प्रश्न अुत्तरीत आहेत. कुणाकडूनही ठोस उत्तर मिळत नाही. अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याचा भाजपला राग का येत आहे? आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक मंडळाने वर्षभरापूर्वी बंदी घातलेले विमान अजित पवारांच्या प्रवासासाठी का वापरले? अजित पवार स्वतःची फार काळजी घेत होते, ते हे विमान कसे वापरतील? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.

मंत्री जयकुमार गोरे गणपतीचीही बैठक घेतील

सुषमा अंधारे यांनी यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रचारसंभांवरही निशाणा साधला. पालकमंत्री जयकुमार गोरे पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत असतील, तर गावच्या गणपती मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठीही ते बैठक घेतील, असे त्या म्हणाल्या.

अस्थिकलशावरून पटेल, तटकरेंवर टीका

उल्लेखनीय बाब म्हणजे सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशावरून नुकतीच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. राख थंड होण्याच्या आधी पक्ष बळकवणारे लोक तुम्ही… संवेदना नावाची कुठलीच गोष्ट शिल्लक नाही पण जनाची नाही तर किमान मनाची… असे असंख्य अस्थिकलश तयार करून आता त्याचेही मार्केटिंग करणार आहात का? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.

दरम्यान, अजित पवार यांचे गत बुधवारी झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित विलीनीकरणाचा मुद्दाही आता थंड बस्त्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची मिस्ट्री:अजित पवारांच्या मृत्यूनंतर केवळ तर्कवितर्क; दादांची इच्छा काय होती? कुणालाच माहिती नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ भावनिक नाही, तर ती सत्तासमीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आधीपासून सुरू असलेल्या मतभेदांना या घटनेमुळे नवे वळण मिळाले आहे. विलीनीकरणाच्या कथित चर्चेमुळे राज्याचे राजकीय वातावरण अधिकच गूढ बनले आहे. अजित पवारांच्या इच्छेविषयी स्पष्ट माहिती नसल्याने या प्रकरणी सध्या केवळ तर्कवितर्कांचेच राज्य आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *