इंजिनिअर, एमबीए केलेले उच्चशिक्षित तरुण बनताहेत ‘डिलिव्हरी बॉय’:पदवीच्या आधारावर मिळणाऱ्या 10 हजारांच्या नाेकरीकडे पाठ


हातात इंजिनिअर वा एमबीएची पदवी, एसी केबिनमध्ये बसण्याचे स्वप्न पाहणारी तरुणाई आज नाशिकच्या रस्त्यांवर भरउन्हात दुचाकीवरून विविध वस्तू तसेच फूड पार्सल घेऊन जाताना दिसत आहे. इंजिनिअरिंग, एमबीए आणि फार्मसीसारख्या पदव्या घेतलेले तरुण कंपन्यांमधील नोकऱ्यांवर पाणी सोडून ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करायला तयार झाले आहेत. इंजिनिअरिंग किंवा एमबीए करूनही योग्य वेतन मिळत नसल्याने, त्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसते. दिवसाला 100 किलोमीटरचा प्रवास आणि 15 तासांचा राबता, तरी ही मुले ‘कॉर्पोरेट’ जॉबपेक्षा ‘कमिशन’आधारित कामाला पसंती देत असून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमावत आहेत. शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये 10-12 तास काम करूनही अनेक पदवीधारकांच्या हातात केवळ 9 ते 12 हजार रुपये पगार पडतो. याउलट, ऑनलाइन माध्यमातून बुकिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी वस्तूंची डिलिव्हरी केल्यास महिन्याला 25 ते 30 हजार रुपये सहज मिळत आहेत. दिवसाला 1200 ते 2500 रुपयांपर्यंत होणारी कमाई तरुणांना आकर्षित करत आहे. हे काम कष्टाचे आहे आणि दिवसाला 80 ते 100 किलोमीटरचारोज प्रवास करावा लागतो. मात्र, आर्थिक स्थैर्यासाठी तरुण याकडे वळले आहेत.नाशिकमध्ये सध्या 6,500 हून अधिक जण डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, शहराची ही धावपळ पहाटे 4 वाजेपासूनच सुरू होते. दूधापासून विविध ग्रोसरी वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी पहाटेपासूनच तरुणांची लगबग सुरू असते. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या कामात आता केवळ तरुणच नव्हे, तर पन्नाशी ओलांडलेले नागरिक आणि 150 तरुणींचाही सहभाग आहे. सिव्हिल इंजिनिअर ड्रॉप आउट, तरीरोज एक हजार हातात.. सिव्हिल इंजिनिअर म्हणून शिक्षण घेत होतो. मात्र, ड्रॉप आउट झाल्यामुळे खर्च भागवण्यासाठी पहाटे 4 वाजेपासून डिलिव्हरीचे काम सुरू केले. इथे काही टार्गेट नाही की कोणाची कटकट नाही. जेवढे जास्त काम, तेवढे जास्त पैसे. पहाटे 4 ते दुपारपर्यंत मी 800 ते 1000 रुपये कमावतो आहे. – गुलाम ऑफिस काम सोडले अन‌् मिळाला नोकरीपेक्षा दुप्पट पगार एका क्लासमध्ये ऑफिस स्टाफ म्हणून काम करत होतो. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत काम करूनही 10 ते 12 हजार रुपये मिळत होते. आता मात्र ‘डिलिव्हरी’चे काम करून 27 ते 30 हजार रुपये महिन्याला हातात पडत आहेत. – गौरव कंपनीतील नोकरी सोडली, आता दिवसाला 1700 उत्पन्न बी.ई. मेकॅनिकल केल्यानंतर सातपूरच्या एका कंपनीत 9,500 रुपये पगारावर प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. वर्षभरानंतरही पगार वाढला नाही. परिस्थिती हलाखीची असल्याने रात्री पार्ट टाइम डिलिव्हरी सुरू केली. तेव्हा दोन तासाचे 500 रुपये मिळत होते. मग कंपनीतील नोकरी सोडली आणि पूर्णवेळ डिलिव्हरी बॉय म्हणूनच काम सुरू केले. आतारोज 1700 रुपये कमावतो आहे. – आकाश कंपनीमध्ये जबाबदारी अधिक, मात्र पगार कमी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करताना जबाबदारी जास्त आणि पगार कमी होता. तिथे सन्मान मिळत नव्हता. इथे कष्ट आहेत, पण श्रमाचा योग्य मोबदला मिळतो, अशी भावना एका पदवीधर तरुणाने व्यक्त केली. 12 ते 15 तास काम करण्याची तयारी असूनही उद्योगांमध्ये मिळणारे तुटपुंजा पगार आजच्या घडीला चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच नाशिकची उच्चशिक्षित तरुणाई करिअरच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडून डिलिव्हरी बॉयच्या बॅगमध्ये भविष्य शोधत आहेत. उद्योगांच्या पगारापेक्षा अधिक इन्सेन्टिव्ह! आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये 12 तास काम करून पदवीधरांना 10 ते 15 हजार रुपये हातात मिळतात. डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत मुले महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये मिळवत आहेत. विशेष म्हणजे, हे काम करताना इन्सेन्टिव्हही चांगला मिळतो. त्यामुळे कंपनीतील नोकरीपेक्षा डिलिव्हरी बॉयच्या जॉबकडे तरुणाईचा कल वाढत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks