औंढ्यात महाशिवरात्रीला आकाशात 200 ड्रोनचा होणार लेझर शो:पाच किलो मिटर अंतरावरून पाहता येणार, महाशिवरात्री महोत्सवाची जय्यत तयारी


देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून यावर्षी रविवारी ता. 15 रात्री आठ वाजता आकाशात 200 ड्रोनद्वारे लेझर शो सादर होणार आहे. परिसरातील पाच किलो मिटर अंतरावरील नागरीकांना हा शो पाहता येणार आहे. या लेझर शोचे यावर्षी मोठे आकर्षण असणार आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, तहसीलदार हरिष गाडे यांनी संस्थान परिसरात पाहणी करून आवश्‍यक सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार मंदिर परिसरातील कामे पूर्णत्वाला आली आहेत. दरम्यान, महाशिवरात्री निमित्त शनिवारी ता. 14 मध्यरात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे, मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिहर भोपी, वैजनाथ पवार, सुरेंद्र डळफ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर रविवारी ता. 15 पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या पश्‍चिमद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. त्या ठिकाणावरून दर्शनासाठी सुमारे 3 तासापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. या शिवाय भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी अभिषेक पुजा बंद केली जाणार आहे. नागनाथ महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 25 क्विंटल साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. त्यानंतर रात्री सात वाजता नागनाथाची पालखी काढली जाणार आहे. शहरातील राऊळेश्‍वरांच्या मंदिरातून पालखी परत नागनाथ मंदिरात येणार आहे. दरम्यान, रात्री आठ वाजता भक्तनिवास पार्किंग परिसरात लेझर शो होणार असून यामध्ये तब्बल 200 ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यामध्ये मंदिराची प्रतिकृती, नागनाथाची पिंड, शंकर पार्वती यांची मुर्ती तयार केली जाणार असून यामध्ये मंदिराचे महत्व, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा केलेला जिर्णोध्दार तसेच मंदिराची माहिती दिली जाणार आहे. जमीनीपासून सुमारे 150 मिटर उंच आकाशात हा लेझर शो सादर केला जाणार आहे. परिसरातील पाच किलो मिटर अंतरापासून हा शो पाहता येणार आहे. वीस ते तीस मिनीटांच्या या शो साठी व्हीआयपी स्टेज तयार करण्यात आले आहे.

या शिवाय नागनाथ मंदिराच्या बेवसाईटचे उदघाटन केले जाणार असून देश विदेशातील भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. या शिवाय दर्शन, अभिषेकासाठी ऑनलाईन बुकींग करता येणार आहे. दरम्यान, यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला रथोत्सवाचा कार्यक्रम बुधवारी ता. 18 रात्री होणार आहे. यावेळी सुमारे 1 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. याच दिवशी दुपारी दोन ते पाच यावेळेत महाप्रसाद होणार असून गुरुवारी ता. 19 काल्याच्या किर्तनाने यात्रेची सांगता होणार आहे. मंदिर परिसरात 100 सीसीटीव्हीचा वॉच या यात्रेमध्ये सुमारे 2 लाखपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस विभागाने दोन ठिकाणी पोलिस मदत केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय परिसरात 100 सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. त्यामाध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *